कोल्हापूर :
महापालिकेतर्फे तिसऱ्या शहर विकास आराखड्याचे कामकाज सुरू झाले आहे. शहरातील वापरात असलेल्या जागांचा वापर आणि नवीन योजनाबाबत शहरातील रहिवाशांचे मत, आक्षेप नोंदवण्यास सुरूवात झाली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर जनमत सर्वेक्षण सुरू केले असून यात सहभागी होण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
1999 साली मंजूर झालेल्या कोल्हापूर शहराच्या दुसऱ्या आराखड्याची मुदत संपून सहा वर्षे झाली. महाराष्ट्र प्रदेश नगररचना कायदा 1966 नुसार प्रत्येक शहराचा दर वीस वर्षांनी विकास आराखडा तयार केला जातो. याव्दारे शहरात आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा आढावा घेवून जमिन वापरांवर नियंत्रण, पुढील दशकातील लोकसंख्येसाठी सार्वजानिक सुविधांची तरतुद करुन लोकांचे राहणीमान सुधारण्याचा प्रयत्न व्हावा हा हेतू असतो.
1999 ला मंजूर दुस्रया सुधारीत विकास आराखड्यानुसार शहरात चार टक्केही शहराचा विकास झालेला नाही. तिसऱ्या विकास आराखड्याचे नियोजन करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने 2018 सालीच दिले होते. त्यासाठी कक्ष स्थापन करुन तज्ञांची समिती नेमण्यास सांगितले होते. मात्र कासवछाप गतीने आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले. खासगी कंपनीकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. 1971 व 1991 च्या सुधारीत शहर विकास आराखड्यात शहराची आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या आजूबाजूच्या आठ गावांचा समावेश करण्याच्या सुचना केल्या होत्या. राजकीय अनास्थेमुळे शहराची हद्दवाढ तीळभरही सरकली नाही. आता नव्या आराखड्यातून शहराचा पुढील वीस वर्षाचा नियोजित विकासाचा प्रारुप आराखडा मांडला जाईल. राज्य सरकारच्या मंजूरीनंतर तो लागू केला जाणार आहे.
- ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जाची सोय
महापालिकेच्या संकेतस्थळावर जनमत सर्वेक्षण सुरू केले आहे. याव्दारे ऑनलाईन अर्ज भरता येइल. याशिवाय राजारामपुरीतील महापालिकेच्या कार्यालयात लेखी सक्षम अर्ज दाखल करता येणार आहे. शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांना माहिती व्हावी, त्यांच्या कोणत्या अपेक्षा आहेत, जनमत चाचणीमध्ये त्यांनी सहभागी व्हावे यासाठी एक पथक थेट नागरिकांना भेटून माहिती देणार आहे.








