आतापर्यंत मोठ्या संख्येने दुरुस्तीचे अर्ज निकालात काढले : अत्यावश्यक असल्यासच दुरुस्ती करण्याची महानगरपालिकेला सूचना
बेळगाव ; जन्म-मृत्यू दाखल्यातील चुकीच्या दुरुस्तीकरिता महापालिकेकडे अर्ज केले जातात. त्यामुळे दाखल्यातील दुरुस्ती करून हे अर्ज निकालात काढले आहेत. मात्र महापालिकेने मोठ्या संख्येने दाखल्यातील दुरुस्तीचे अर्ज निकालात काढल्याने जनरल रजिस्ट्रार ऑफ कर्नाटक यांनी आक्षेप घेतला आहे. अधिकारापेक्षा अधिक दाखल्यांची दुरुस्ती केली असल्याचे म्हटले आहे. अत्यावश्यक असल्यासच दाखल्यातील दुरुस्ती करावी, अशी टिपणीदेखील महापालिकेला दिली आहे. जनरल रजिस्ट्रार विभागाकडून महापालिकेला दाखल्यांच्या दुरुस्तीबाबत पत्र आले आहे. 2019 मध्ये याबाबत माहिती घेण्यात आली होती. तर 2021 मध्ये ही नियमावली शासनाने केली आहे. मात्र महापालिकेला याबाबतची सूचना अलीकडेच करण्यात आली आहे. जन्म व मृत्यू दाखल्यातील चुकीची दुरुस्ती महापालिकेकडून केली जाते. याकरिता ठराविक कालावधीची मर्यादा महापालिकेला घालण्यात आली आहे. जन्म दाखला व शाळेतील प्रमाणपत्रामधील नावात बदल झाल्यास किंवा जन्म तारखेमध्ये बदल असल्यास दुरुस्तीसाठी अर्ज केले जातात. त्याचप्रमाणे नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा नावात थोडीफार चूक असल्यास दुरुस्त करण्यासाठी मनपा कार्यालयात धाव घेतली जाते. प्रतिज्ञापत्र आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जन्म दाखल्यात दुरुस्ती करण्यात येते. अधिकाराचा विनियोग करून महापालिकेने असंख्य दाखल्यांतील चुकीची दुरुस्ती केली आहे. दुरुस्ती केलेल्या दाखल्यांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जनरल रजिस्ट्रार ऑफ कर्नाटक यांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक दाखल्यांची दुरुस्ती केल्याचे महापालिकेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच दुरुस्ती करताना पूर्ण नाव न बदलता उर्फ असा उल्लेख करून नावात दुरुस्ती करावी, अशी सूचनादेखील केली आहे. त्याचप्रमाणे दाखल्यातील दुरुस्ती करणे अपरिहार्य असल्यासच महापालिकेकडून दुरुस्ती करावी, अशी सूचना आरोग्य विभागाला केली आहे. त्यामुळे दाखल्यातील दुरुस्तीबाबत केलेल्या सूचनांचे पालन महापालिकेला करावे लागणार आहे.
दाखल्याची नोंद व्यवस्थित करा
जन्म दाखल्याची नोंद आता ऑनलाईन केली जाते. त्याकरिता विविध रुग्णालयांना लॉगईन आयडी देण्यात आली आहे. त्याद्वारे जन्म-मृत्यूची नोंद रुग्णालयांमार्फत केली जाते. जन्माबाबतची नोंद ऑनलाईनद्वारा करताना व्यवस्थित माहिती नोंद केली जात नाही. अनेकदा नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका केल्या जातात. तसेच आई-वडिलांच्या आधार ओळखपत्रातील नोंदीनुसार ऑनलाईनद्वारे नावे नेंद करणे आवश्यक आहे. पण खासगी रुग्णालयाकडून तसे केले जात नाही. त्यामुळे जन्म दाखल्यांमध्ये चुकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेने खासगी रुग्णालयांना याबाबतची माहिती देऊन जन्म दाखल्याची नोंद व्यवस्थित करण्याची सूचना देणे आवश्यक आहे. तसेच नावातील स्पेलिंगमध्ये चुका होणार नाहीत, याची काळजी घेण्याची सूचनाही रुग्णालयांना करणे अत्यावश्यक आहे.









