तामिळनाडूत सर्वाधिक 9.5 टक्क्यांची वाढ, ओबेसिटीग्रस्तांमध्ये मुस्लीम महिलांचे प्रमाण अधिक
भारताच्या दाक्षिणात्य राज्यांमधील महिलांमध्ये स्थुलत्व (ओबेसिटी) वेगाने वाढत आहे. यासंबंधी हैदराबादच्या कौन्सिल ऑफ सोशल डेव्हलपमेंटने एक अध्ययन करविले आहे. तामिळनाडूत सर्वाधिक महिला स्थुलत्वाच्या शिकार ठरल्या आहेत. तर तेलंगणात सर्वात कमी महिला स्थुलत्वाच्या कक्षेत आहेत.

या अध्ययनासाठी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (एनएफएचएस) 4 आणि 5 च्या डाटाची तुलना करण्यात आली. ही आकडेवारी 2019-21 पर्यंतची हाहेती. अध्ययनात 15-49 वयोगटातील महिलांच्या माहितीचे आकलन करण्यात आले आहे. यासाठी तेलंगणातील 31 जिल्हे, कर्नाटकातील 30, आंध्रप्रदेशातील 13, केरळमधील 14 आणि तामिळनाडूतील 32 जिल्हे सामील करण्यात आले. तामिळनाडूच्या महिलांमध्ये स्थुलत्व 9.5 टक्क्यांनी वाढल्याचे संशोधकांना आढळून आले. तसेच कर्नाटक आणि केरळमध्ये हा आकडा 6.9 टक्के आणि 5.7 टक्के इतका आहे. तेलंगणात स्थुलत्वाला तोंड देणाऱया महिलांच्या संख्येत 2 टक्क्यांची वाढ झाली आहे.
पुरुषांपेक्षा अधिक स्थुलत्व
राष्ट्रीय स्तरावर सुमारे एक चतुर्थांश महिला (24 टक्के) स्थुलत्वाला तोंड देत आहेत. पुरुषांमध्ये हा आकडा काहीसा कमी (22.9 टक्के) आहे. शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये राहत असलेल्या महिलांची तुलना अध्ययनात करण्यात आली आहे. शहरांमधील महिलांमध्ये स्थुलत्वाचे प्रमाण अधिक असल्याचा निष्कर्ष यातून निघाला आहे.
ख्रिश्चन महिलांमध्ये अधिक प्रमाण
राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक 31.2 टक्के ख्रिश्चन महिला स्थुलत्वाने ग्रस्त आहेत. परंतु दाक्षिणात्य राज्यांमध्ये मुस्लीम महिलांमध्ये स्थुलत्व अधिक आहे. संशोधनानुसार ही स्थिती चिंताजनक आहे, कारण राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत दाक्षिणात्य राज्यांमध्ये स्थुलत्व अधिक आहे. संशोधनात जातीच्या आधारावरही महिलांच्या स्थुलत्वाचे विश्लेषण करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर स्थुलत्व ओबीसींमध्ये 24.6 टक्के, अनुसूचित जातींमध्ये 21.6 टक्के, अनुसूचित जमातींमध्ये 12.6 टक्के तर इतर वर्गांमध्ये 29.6 टक्के आहे.









