जत प्रतिनिधी
ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे व समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी, या मागणीसाठी जत तहसील कार्यालयावर गुरुवारी दि. ७ डिसेंबर रोजी जत तालुका सकल ओबीसी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
जत तालुक्यातील ओबीसीं समाजाचा जत तहसील कार्यालयावर गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी मोर्चा काढण्यात येणार असून त्यासाठी जत तालुक्यात गावोगावी जाऊन मोर्चास येण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. जत येथून प्रचाराला सुरुवात झाली. तेथून केंचराया मंदिर वळसंग येथे बैठक झाली. यामध्ये ओबीसी प्रवर्गातील नेत्यांचा व नागरिकांचा प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
मोर्चेकरांच्या प्रमुख मागण्या अशा : ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांचेवर एकतर्फी टीका, टिप्पणी, अस्लिल मजकूर, धमकी देणे थांबवावे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण संविधान मार्गाने न्यायालयात टिकणारे देण्यात यावे, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी त्वरित लागू करण्यात याव्यात, अनुसूचित जाती, जमाती आरक्षण प्रमाणे ओबीसी आरक्षणाला घटनात्मक दर्जा द्यावा, असंवैधानिक क्रिमीलेअर अट रद्द करावी, आदी प्रमुख मागण्यासाठी प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी ओबीसी नेते सलीम भाई गवंडी, शंकर वगरे, महादेव पाटील , तुकाराम माळी, बसवराज बिराजदार, सोमाण्णा हाक्के, जे. के. माळी, तायाप्पा वाघमोडे, सलिम नदाफ, शिवानंद बिराजदार, लक्ष्मण पुजारी, हाजी हुजरे, बाबासाहेब माळी, हे प्रचार दौऱ्यात सहभागी होते.