जिल्हा पंचायत सभागृहात भ्रष्टाचार निर्मूलन जागृती सप्ताह
बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कर्नाटक लोकायुक्त जिल्हा सेवा कायदा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जि. पं. सभागृहात भ्रष्टाचार विरोधी जागृती सप्ताह पार पडला. व्यासपीठावर जि. पं. सीईओ हर्षल भोयर, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, लोकायुक्तचे अधिकारी हणमंत रॉय, मुरलीमनोहर रे•ाr उपस्थित होते. केंद्रीय सतर्कता आयोगातर्फे भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताहाला 30 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. शासकीय अधिकाऱ्यांना सत्यनिष्ठ कार्याची शपथ देण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार निर्मूलनासाठी विविध ठिकाणी जागृती केली जात आहे. यावेळी हणमंत रॉय म्हणाले, सार्वजनिक समाजात काम करत असताना शासकीय अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष राहिले पाहिजे. भ्रष्टाचारामुळे सामाजिक, राजकीय व आर्थिक बाबींवर मोठा परिणाम होतो. भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. भ्रष्टाचार निर्मूलन, भ्रष्टाचारविरुद्ध लढा तसेच भ्रष्टाचाराचे गंभीर परिणाम व धोके याबाबत अधिक माहिती दिली.
शासकीय अधिकारीच अधिक दक्ष राहणे गरजेचे
यावेळी मुरलीमनोहर रे•ाr म्हणाले, शासकीय कामासाठी लाच मागणे, कामाला विलंब करणे, लाच न दिल्यास त्रास देणे, आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेणे, गैरप्रकारे मालमत्ता जमा करणे हे बेकायदेशीर आहे. अशांवर कारवाई केली जाते. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासकीय अधिकारीच अधिक दक्ष असले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. हर्षल भोयर यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. दैनंदिन कामकाजात निष्ठा, दक्षता घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा’
‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा’ या घोषवाक्याच्या माध्यमातून भ्रष्टाचारा विरोधी जागृती केली जात आहे. शाळा, महाविद्यालय स्तरावर देखील जागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. एकूणच भ्रष्टाचार रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.









