मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओ. पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या समर्थकाची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या अण्णाद्रमुकच्या सर्वसाधारण सभेच्या प्रस्तावाच्या विरोधात दाखल याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या आदेशाप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास आम्ही इच्छुक नसल्याचे न्यायाधीश संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या समर्थकांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील के.के. वेणुगोपाल यांना सांगितले आहे.
संबंधित आदेशाप्रकरणी आम्ही सध्या हस्तक्षेप केल्यास मोठी अराजकता निर्माण होणार आहे. कधीकधी गोष्टींना आपोआप ठीक होऊ देणेच चांगले असते असे खंडपीठाने म्हटले आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित खटल्यांच्या त्वरित सुनावणीचा निर्देश दिला आहे. तसेच पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सर्व खटल्यांच्या एकीकरणासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा दिली आहे.
पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या समर्थकांनी उच्च न्यायालयाच्या 25 ऑगस्ट रोजीच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने पन्नीरसेल्वम यांच्या याचिका फेटाळल्या होत्या.









