गर्भवती महिला-बालकांना आहाराबाबत मार्गदर्शन, विविध साहित्यांची मांडणी
बेळगाव : महिला व बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना साजरा केला जातो. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण अभियान राबविले जाते. अंगणवाडी केंद्रामध्ये विविध कार्यक्रम राबवून आहाराचे महत्त्व पटवून दिले जात आहे. या अंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये पोषणयुक्त आहाराची उत्कृष्ट मांडणी केली जाते. शिवाय गर्भवती महिला, स्तनदा महिला व 0 ते 13 वर्षाखालील बालकांना पोषण आहार कसा द्यावा, याबाबत प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले जात आहे. याबरोबर स्थानिक पातळीवर जनजागृती केली जात आहे.
30 सप्टेंबरपर्यंत पोषण अभियान
या पोषण अभियानात सहभोजन कार्यक्रम, गर्भवती महिलांना डोहाळे पुरवा कार्यक्रम, हिमोग्लोबिन तपासणी, रांगोळी स्पर्धा आणि उत्तम पोषणांच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहारासाठी माहिती दिली जाते. त्याचबरोबर कुपोषण रोखण्यासाठी बालकांना विविध समतोल आहाराबाबत मार्गदर्शन केले जाते. जिल्ह्यात 5331 अंगणवाडी केंद्रे आहेत. या सर्व केंद्रामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत पोषण अभियान राबविले जाणार आहे.
यंदाही पोषण अभियानाला मिळेल उत्तम प्रतिसाद
ग्रामीण आणि दुर्गम भागात महिला आणि बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. विशेषत: या उपक्रमांतर्गत गर्भवती महिला आणि बालकांच्या पोषण आहाराबाबत प्रत्यक्ष माहिती दिली जाते. गतवर्षी झालेल्या पोषण आहार अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यंदा देखील या पोषण अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा महिला व बालकल्याण खात्याने व्यक्त केली आहे.
प्रात्यक्षिकासह आहाराबाबत जागृती
जिल्ह्यात 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत महिला व बालकांना प्रत्यक्ष अंगणवाडी केंद्रात बोलावून हा कार्यक्रम केला जातो. प्रात्यक्षिके दाखवून आहाराबाबत जागृती केली जात आहे. शिवाय इतर कार्यक्रमदेखील हाती घेतले जात आहेत.
रेवती होसमठ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण खाते









