कोल्हापूर / साजिद पिरजादे :
‘झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा’, असा संदेश देत रोपांचे वाटप करणारे रविवार पेठेतील दिलबहार तालीम मंडळ यंदा १४१ वे वर्ष साजरे करत आहे. मंडळाकडून दरवर्षी १००८ रोपांचे वाटप केले जाते, ‘या रोपाची देखभाल तुमच्या मुलाप्रमाणे करा’, असा संदेश मंडळातर्फे दिला जातो. १८८४ मध्ये रामेश्वर प्रासादिक मंडळ या नावाने स्थापन झालेली ही संस्था आज सामाजिक, धार्मिक, क्रीडा आणि पर्यावरणविषयक कार्यामध्ये अग्रेसर आहे.
वृक्षलागवडीचा पर्यावरणपूरक संदेश देत या मंडळाने एक आदर्श घालून दिला आहे. फुटबॉल या मंडळाचे वैशिष्ट्य मानले जाते. याशिवाय दरवर्षी महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला जातो. याअंतर्गत मंडळाकडून महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. क्रीडा स्पर्धा, व्यायाम प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाचे आयोजन केले जाते. नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी असे अनेक विधायक उपक्रम राबवले जातात.
जिल्ह्यात श्रद्धारथान असलेल्या साई मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही मंडळ पार पाडते. हे मंदिर वर्षभर भक्तांसाठी खुले असते आणि विविध धार्मिक कार्यक्रम येथे राबवले जातात. तरुण पिढीला निर्व्यसनी आणि निरोगी ठेवण्यासाठी मंडळाची स्वतंत्र व्यायामशाळाही कार्यरत आहे. यामध्ये शेकडो युवक व्यायाम करतात. गणेशोत्सवात संस्कृत भाषेत आरती केली जाते.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाचे आगमन होते. यावर्षी गणेश मंडपात नवदुर्गेची प्रतिकृती उभारून धार्मिक परंपरा जोपासली आहे. जिल्ह्यातील भाविक या गणपतीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात. दिलबहार तालीम मंडळाचा हा गणेशोत्सव म्हणजे सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणीय भान असलेला एक सांस्कृतिक उत्सव ठरला आहे.
२००४ पासून येणाऱ्या पाहुण्यांना रोप देऊन वृक्षवाढीचा संदेश दिला जातो. दररोज मंडळाच्या आरतीला ३० ते ४० पाहुणे येतात. त्यांना भेट म्हणून रोप आणि प्रसाद दिला जातो. तसेच या रोपाची देखभाल तुमच्या मुलाप्रमाणे करा, त्यांना वाढवा, असा मोलाचा संदेशही मंडळाकडून दिला जातो.
– पद्माकर कापसे, मंडळाचे कार्यकर्ते








