वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी चौकशीचा ससेमिरा
कोलकाता / वृत्तसंस्था
भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माविरोधात कोलकाता पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्यांनी मोहम्मद पैगंबरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल कोलकातामध्ये नुपूरविरोधात 10 एफआयआर दाखल आहेत. या नोटीसपूर्वी पश्चिम बंगालमधील एमहर्स्ट आणि नरकेलदांगा पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी हजर न होता वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपने नुपूर शर्मा यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली होती. तथापि, त्यांच्यावर देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यामुळे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. तसेच नुपूर शर्मा यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानेही फटकारले होते. नुपूर शर्माच्या वक्तव्यामुळे संपूर्ण देश पेटला आहे. त्यांनी टीव्हीवर येऊन माफी मागावी, असे न्यायालयाने सांगितले आहे. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आणखी एका याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांच्यावर केलेली टिप्पणी मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्माच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने उदयपूरमध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्याचवेळी महाराष्ट्रातील अमरावतीमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. याशिवाय छत्तीसगडमध्ये एक मॉडेल आणि आणखी एका व्यक्तीला खुनाची धमकी देण्यात आली आहे.
अमरावतीतील हत्येचा तपास एनआयएकडे
21 जून रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे याच्या हत्येची चौकशी करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ उमेशने फेसबुकवर एक पोस्ट केली होती. पोस्टिंग केल्यावर एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी धारदार शस्त्रांनी त्याची हत्या घडवून आणली होती. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली आहे.









