गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह : पोलिसांना संशय
वृत्तसंस्था/ कोल्लम
केरळच्या कोल्लम येथील एका कॉन्व्हेंटमध्ये ननचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. तामिळनाडूची रहिवासी 33 वर्षीय महिलेचा मृतदेह कॉन्व्हेंटमधील एका खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे. या मृत ननचे नाव मेरी स्कोलास्टिका होते आणि ती मूळची मदुराई येथील रहिवासी होती. तसेच ती मागील तीन वर्षांपासून कॉन्व्हेंटमध्ये राहत होती.
कॉन्व्हेंटमधील घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले होते. पोलिसांनी ननला रुग्णालयात हलविले, जेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. महिलेच्या खोलीतून एक सुसाइड नोट मिळाली आहे. परंतु त्यात केवळ ती मनोवैज्ञानिक समस्यांनी ग्रस्त असल्याचे संकेत मिळाले आहेत. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. ननने आत्महत्या का केली याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.









