नवी दिल्ली
देशामध्ये दूरसंचार ग्राहकांची संख्या चालू वर्षातील फेबुवारी महिन्यात घटली असून घटीसोबत हा आकडा 116.60 कोटीवर राहिला आहे. याच दरम्यान रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया यासारख्या कंपन्यांच्या मोबाईल ग्राहकांची संख्या मोठय़ा प्रमाणात घसरली आहे, अशी माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण (ट्राय) यांनी सादर केलेल्या आकडेवारीतून दिली आहे.
या सर्व आकडेवारीमध्ये भारती एअरटेल एकमेव कंपनी राहिली आहे, की ज्यांची ग्राहक जोडणीत वाढ राहिली आहे. दुसरीकडे खासगी दूरसंचार ऑपरेटरांच्या बाजारातील हिस्सेदारीत वाढ झाली आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बीएसएनएल आणि एमटीएनएलने आपले ग्राहक गमावले असल्याचे दिसून आले आहे.
ट्रायच्या अहवालानुसार भारतामध्ये टेलिफोन ग्राहकांची संख्या जानेवारी 2022 च्या अंतिम कालावधीपर्यंत 116.94 कोटीने घटून फेब्रुवारीपर्यंत 116.60 कोटीवर राहिली असून हा घसरणीचा टक्का 0.29 वर राहिला आहे. यातील राज्यांमध्ये उत्तर प्रदेश पूर्व, जम्मू काश्मीर आणि हरियाणाला वगळता संपूर्ण देशात दूरसंचार सर्कलमध्ये मोबाईल ग्राहकांची संख्या घसरली आहे.









