5 वर्षांच्या कालावधीत संख्येत मोठी वाढ : आता 11 जिल्ह्यांमध्ये फैलावले आशियाई सिंह
वृत्तसंस्था/ जुनागढ
गुजरातमध्ये आशियाई सिंहांच्या संख्येत मागील 5 वर्षांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. मे 2024 मध्ये करविण्यात आलेल्या नव्या गणनेनुसार आता राज्यात सिंहांची संख्या 891 झाली आहे. 2020 मध्ये ही संख्या 674 होती. म्हणजेच सिंहांच्या संख्येत 217 ने वाढ झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी बुधवारी याची माहिती दिली आहे.
सिंह आता केवळ गिरच्या जंगलांपुरती मर्यादित नाहीत, तर पूर्ण सौराष्ट्र क्षेत्राच्या 11 जिल्ह्यांमध्ये फैलावलेले आहेत, यात जंगलांसोबत किनारी आणि बिगरवन क्षेत्रही सामील असल्याचे पटेल यांनी सांगितले आहे.
सिंहगणनेची आकडेवारी
एकूण सिंह 891
2020 मधील संख्या 674
5 वर्षांमधील वृद्धी 217
सिंहांचे प्रमाण 196
सिंहिणींचे प्रमाण 330
गिरबाहेर सिंहांचा अधिवास
गिर राष्ट्रीय अभयारण्यात 384 सिंह आढळून आले, तर 507 सिंह अभयारण्याबाहेरील भागांमध्ये गणले गेले आहेत. याचा अर्थ सिंहांची संख्या गिरबाहेर आता वेगाने वाढतेय असे उद्गार गुजरातच्या वन विभागाचे प्रमुख संरक्षक जयपाल सिंह यांनी काढले आहेत.
सौराष्ट्राच्या 11 जिल्ह्यांमध्ये वावर
जूनागढ, गिर सोमनाथ, भावनगर, राजकोट, मोरबी, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका, जामनगर, अमरेली, पोरबंदर, बोटाद.
संरक्षित क्षेत्रांमध्येही दिसले सिंह
पानिया अभयारण्य, मितियाला अभयारण्य आणि गिरनार तसेच बारडा अभयारण्यात सिंहांचे अस्तित्व दिसून आले आहे. याचबरोबर काही सिंह किनारी क्षेत्र आणि खुल्या मैदानी भागात आढळून आले आहेत. भावनगर जिल्ह्यात एका समुहात सर्वाधिक 17 सिंह दिसून आले.
कशाप्रकारे झाली गणना?
गुजरातमध्ये आशियाई सिंहांची 16 वी गणना करण्यात आली आहे. ही गणना 10-13 मेदरम्यान करण्यात आली. या गणनेत 35 हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापण्यात आले, यात 11 जिल्ह्यांमधील 58 तालुक्यांना समाविष्ट करण्यात आले होते. या गणनेत सुमारे 3 हजार स्वयंसेवकांनी भाग घेतला, यात वन विभागाचे अधिकारी, गणना करणारे कर्मचारी आणि निरीक्षक सामील होते.









