उत्तरप्रदेशात प्रमाण सर्वाधिक : सर्वेक्षणात आकडा आला समोर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात गंगा नदीतील डॉल्फिन्सची संख्या आता 6327 झाली आहे. यात उत्तरप्रदेश 2397 डॉल्फिन्ससह आघाडीवर आहे. यानंतर बिहार (2,220), पश्चिम बंगाल (815), आसाम (635) आणि झारखंड (162) क्रमांक लागतो. भारतात पहिल्यांदाच गंगा नदीच्या डॉल्फिन्सच्या संख्येच्या आकलन अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे.
2021-23 पर्यंत करण्यात आलेल्या विस्तृत सर्वेक्षणाच्या आधारावर या संख्येचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. यात 8 हजार किलोमीटरपेक्षा अधिक क्षेत्रातील 28 नद्यांमध्ये पाहणी करण्यात आली. यादरम्यान भारताच्या नॅशनल अॅक्वेरियम, गंगा डॉल्फिन्सच्या संख्येवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी अनेक महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढले आहेत. या सर्वेक्षणामुळे गंगा डॉल्फिनयच प्रजातींची स्थिती उत्तमप्रकारे समजून घेण्यास मदत झाली आहे.
गंगा डॉल्फिनच्या संख्येत मागील शतकादरम्यान अनेक कारणांमुळे घट झाली होती. यात शिकार, धरणांमुळे नैसर्गिक अधिवास संपुष्टात येणे, अंदाधुंद मासेमारी या कारणांचा समावेश होता. गंगा डॉल्फिनची घटती संख्या पाहता सरकारने ऑगस्ट 2020 मध्ये ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ सुरू केला होता. डॉल्फिन्सच्या संख्येत झालेली वाढ जलपर्यावरणाच आरोग्य दर्शवित असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
भारतात गंगा डॉल्फिन्सच्या संरक्षणाच्या प्रयत्नांच्या अंतर्गत वैज्ञानिकांनी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात गंगा डॉल्फिनच्या एका नराला उपग्रह टॅग केले आणि त्याला आसामच्या कामरुम जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीत सोडले होते. भारतात कुठल्याही प्रजातीवर करण्यात आलेला हा पहिला उपग्रह टॅगिंग प्रयोग होता. याचा उद्देश गंगा डॉल्फिनविषयी महत्त्वपूर्ण माहिती जमविणे होता. भारतात गंगा डॉल्फिनच्या संख्येतील वाढ जलपर्यावरणीय व्यवस्थेसाठी एक सकारात्मक संकेत आहे.









