चालू वर्षी 10 कोटींच्या पुढे हा आकडा जाण्याची शक्यता : बँक बाजारच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एकीकडे युपीआय व्यवहार वाढत असताना, क्रेडिट कार्डची संख्याही यावर्षी 10 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात देशभरात 8.65 कोटी क्रेडिट कार्डे चलनात होती. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.एप्रिल 2022 मध्ये आकडा 7.5 कोटी होता, सुमारे 15 टक्के इतकी वाढ राहिली आहे. बँक बाजारच्या अहवालात आरबीआयच्या आकडेवारीच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे.
एप्रिलमध्ये अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. मार्केट शेअरच्या बाबतीत, अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरकर्ते एप्रिलमध्ये सर्वाधिक वाढले. त्याचा फायदा सिटी बँकेच्या अधिग्रहणामुळे झाला असल्याचे म्हटले जात आहे.
एप्रिल 2023 मध्ये, फक्त चार बँका-एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक आणि अॅक्सिस बँक यांचा चलनात असलेल्या सर्व क्रेडिट कार्डांचा 71 टक्के हिस्सा होता. एप्रिलमध्ये उद्योगाची सरासरी प्रति व्यवहार 5,120 रुपये होती.
क्रेडिट कार्ड व्यवहारात वाढ
क्रेडिट कार्डच्या वापराने एप्रिल 2023 मध्ये डेबिट कार्डला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 22 कोटींच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये 25 कोटी व्यापारी कार्ड व्यवहार झाले. लोक प्रवास, इलेक्ट्रॉनिक्स, जेवण आणि खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरण्यास प्राधान्य देतात.
डेबिट कार्ड वाढतात, पण व्यवहार कमी होतात
एप्रिलमध्ये, 4.6 कोटी डेबिट कार्ड जोडले गेले, ज्यामुळे देशातील एकूण डेबिट कार्डांची संख्या 96 कोटी झाली. पण गेल्या एका वर्षात डेबिट कार्डचे व्यवहार 16 टक्क्यांनी घसरून 55,000 कोटी रुपयांवर आले आहेत. त्याचवेळी, व्यवहारांची संख्या 30 टक्के कमी होऊन 23 कोटींवर आली आहे.
-आदिल शेट्टी, सीईओ, बँकबझार डॉट कॉम









