विनायक गुंजटकर यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
बेळगाव : तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. या अपघातांमुळे सर्वसामान्यांचे जीव वेठीस धरले जात असून एखाद्या निष्पापाचा बळी जाण्यापूर्वी खड्डे बुजविणे गरजेचे आहेत, असे आवाहन माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी करत उड्डाणपुलावरील तब्बल फूटभर पडलेल्या खड्ड्यांबाबतची माहिती दिली. तसेच पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. उड्डाणपुलावरील रस्त्याची पूर्णत: वाताहत झालेली असून सर्वत्र खडी पसरली आहे. उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीमधील ये-जा करणारे कामगार, तसेच खानापूर, गोवा येथे जाणाऱ्या नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे.
माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी उड्डाणपुलावरील रस्त्यासाठी दोन ते तीनवेळा आंदोलनही केले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते. त्यावेळी पावसाचे कारण देत वेळ मारून नेण्यात आली. मंगळवारी ‘तरुण भारत’ने उड्डाणपुलावरील रस्त्याच्या वाताहतीबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच विनायक गुंजटकर यांनीही या रस्त्याबाबत पुन्हा एकदा आवाज उठविला आहे. मुख्य रस्त्यावर फूटभर खोली असलेले खड्डे पडले असल्याने वाहने अडकून अपघात होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी करण्यात आली.
अपघातामुळे युवक जखमी
उड्डाणपुलावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा अपघात झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. प्रसाद नामक या युवकाला गंभीर इजा झाली आहे. अशाचप्रकारे अपघात होऊन जायबंदी होत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्यांचे जीव टांगणीला लागल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









