साहित्यिक रमजान दर्गा यांचे प्रतिपादन : जिल्हा प्रशासनातर्फे जयंती कार्यक्रम
बेळगाव : जगद्ज्योती बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून नुली चंदय्या हे राजा होते. असे असले तरी त्यांनी स्वत:ला समाजकार्याला वाहून घेतले होते. जात, धर्म, लिंग, गरीब, श्रीमंत असा कोणताच भेदभाव न ठेवता समाजाच्या विकासासाठी जीवन अर्पण केले आहे, अशी माहिती साहित्यिक रमजान दर्गा यांनी दिली. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि सांस्कृतिक खाते व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने येथील कुमार गंधर्व रंगमंदिरामध्ये गुरुवार दि. 31 रोजी नुली चंदय्या यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. नुली चंदय्या यांनी समाजकार्याला वाहून घेतले होते. समाजातील गोरगरीब नागरिकांना व परिसर व प्राण्यांचे संरक्षण यासाठी परिश्रम घेतले आहेत. या माध्यमातून त्यांनी समाजाला मोठी शिकवण दिली आहे, असे रमजान दर्गा यांनी सांगितले. यावेळी हडीगनाळ मठाचे मठाधीश मुत्तेश्वर स्वामीजी यांनी नुली चंदय्या यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी अरळीकट्टी विरप्पा मठाचे शिवमूर्ती स्वामीजी यांचेही भाषण झाले.
भावचित्र मिरवणुकीला चालना
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार एम. होनकेरी, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री, शिशु विकास योजनाधिकारी महांतेश बजंत्री, लिंगायत महासभा जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी किल्ला तलाव येथून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नुली चंदय्या यांच्या भावचित्र मिरवणुकीला चालना दिली.









