आण्विक चाचणी बंदी करारातून रशिया पडला बाहेर
वृत्तसंस्था /मॉस्को
रशियाच्या संसदेने आण्विक चाचणीवर बंदी लागू करणाऱ्या जागतिक करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आण्विक चाचणी बंदी (सीटीबीटी) रद्द करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला रशियाच्या संसदेने मंजुरी दिली आहे. रशियाने 6 ऑक्टोबर रोजी या करारातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती, यानंतर संसदेत यासंबंधीचे विधेयक सादर करण्यात आले होते. जागतिक आण्विक चाचणी बंदी विरोधी विधेयकावर मतदान झाल्यावर राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या देखरेखीत रशियाच्या सैन्याने आण्विक हल्ल्याचा सराव केला आहे. आण्विक हल्ल्याचा सराव यापूर्वीही करण्यात येत होता. यामागील उद्देश शत्रूच्या आण्विक हल्ल्यांना सामोरे जाण्यासाठी अभ्यास करणे आहे. राष्ट्रपती पुतीन यांच्यासह वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी या सरावाची पाहणी केल्याची माहिती रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु यांनी दिली आहे.
व्यापक आण्विक चाचणी बंदी करारातील सहभाग समाप्त करणारे विधेयक मागील आठवड्यात रशियाच्या कनिष्ठ सभागृहात मांडण्यात आले होते. कनिष्ठ सभागृहाकडून मंजुरी मिळाल्यावर हे विधेयक बुधवारी वरिष्ठ सभागृहातही मंजूर झाले आहे. पुतीन यांनी यापूर्वीच या करारातून बाहेर पडण्याची भूमिका जाहीर केली होती. काही तज्ञ आण्विक परीक्षण करणे आवश्यक असल्याचे मानत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 1996 मध्ये अवलंबिण्यात आलेल्या आण्विक परीक्षण चाचणी बंदी करारानुसार जगात कुठेही आण्विक विस्फोटांवर बंदी आहे. या करारात रशिया देखील सामील होता. परंतु हा करार कधीच पूर्णपणे लागू करण्यात आलेला नाही. या कराराला आतापर्यंत चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया, इस्रायल, इराण आणि इजिप्तने पूर्णपणे मान्य केलेले नाही. रशिया आता या करारातून बाहेर पडल्याने त्याला आण्विक परीक्षण करण्याची मोकळीक मिळाली आहे.









