शेतात त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
कसबा सांगाव : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम बाबूराव भोजे (वय 83) यांचे दि. 16 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे निधन झाले. कसबा सांगाव (ता. कागल) येथे त्यांच्या मूळगावी त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. भोजे यांचे पार्थिव बुधवारी सकाळी 10 वाजता मूळ गाव कसबा सांगाव येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी पार्थिव अंबाबाई मंदिराच्या पटांगणात ठेवण्यात आले होते. यावेळी पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत ठेवण्यात आले.
यावेळी पार्थिवाशेजारी पत्नी, मुली, जावई, नातवंडे, पुतणे उभे होते. तेथून मुख्य मार्गावरून शिवाजी चौक, चावडी चौक, बाजारपेठ ते सुळकूड रोड अंत्यसंस्कार ठिकाणापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वजण अमर रहे, अमर रहे शिवराम भोजे अमर रहे, अशा घोषणा देत होते.
गावकऱ्यांनी हार, फुले वाहून अंत्ययात्रेत श्रध्दांजली वाहिली. वारकरी भजन म्हणत होते. यावेळी शोकसभा घेण्यात आली. शासनाच्या वतीने प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ, सरपंच वीरश्री जाधव, दादासो मगदूम स्मारक समिती चेअरमन रजनीताई मगदूम,
मंडलाधिकारी कुलदीप गंवडी, वसंतराव चौगुले पतसंस्था चेअरमन अनिल पाटील, विक्रमसिंह जाधव, राजेंद्र माने, उमेश माळी, अॅड. बाबासो मगदूम, अॅड. संदीप चौगुले, अविनाश मगदूम अत्यंयात्रेत सहभागी झाले.
बॉईज अॅन्ड गर्ल्स हायस्कूल मुख्याध्यापिका सुजाता माने, बी. एच. पाटील, सुनील स्वामी, अनिल काकोडकर, एम. आर. चौगुले, डॉ. राजेंद्र हासुरे, बाळासो देशपांडे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी गावातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.
सांगावात संपूर्ण व्यवहार बंद ठेवून श्रध्दांजली
कसबा सांगाव येथील सर्व दुकानदार, व्यापारांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे स्वतःहून बंद ठेवून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांना श्रध्दांजली वाहिली.








