त्यांच्या रूपाने संशोधन क्षेत्रातील दीप मालवला, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या
कोल्हापूर : कोल्हापूरचे सुपुत्र, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, पद्मश्री डॉ. शिवराम बाबुराव भोजे (वय 83, सध्या रा. राजाराम रायफल, रेवंता अपार्टमेंट, कोल्हापूर) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या रूपाने संशोधन क्षेत्रातील दीप मालवला, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
डॉ. शिवराम भोजे यांचा कसबा सांगाव (ता. कागल) येथे 9 एप्रिल 1942 रोजी जन्म झाला. त्यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण सांगाव येथील मराठी शाळेत झाले. तर आठवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण कागल येथील शाहू हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर पुढील शिक्षण कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमध्ये पूर्ण केले.
1965 साली पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांची मुंबई येथील भाभा अॅटोमिक रिसर्च केंद्रात निवड करण्यात आली. भारत सरकारने त्यांना फ्रान्सला उच्च शिक्षणासह अणुऊर्जा विषयात संशोधन करण्यासाठी पाठवले. फ्रान्समध्ये दोन वर्षे संशोधन व उच्च शिक्षण पूर्ण करून पुन्हा ते भारतात परत आले.
भारत सरकारने इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये शास्त्रज्ञ म्हणून त्यांना रूजू करुन घेतले. या केंद्रात त्यांनी 33 वर्षे शास्त्रज्ञ म्हणून काम केले. 1988 साली एफबीटीआरचे रिअॅक्टर सुपरिटेंडंट म्हणून त्यांनी काम केले. पुढे त्यांनी पीएफबीआर या प्रकल्पाची प्राथमिक डिझाईन, सुरक्षा निकष, मानवी आणि व्यवस्थापकीय बाबी या सर्वांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
नोव्हेंबर 2000 मध्ये ते इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटोमिक रिसर्च सेंटरचे संचालक झाले. 2004 मध्ये डॉ. भोजे यांनी सेवानिवृत्ती घेतली. शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार निवृत्तीनंतर डॉ. भोजे शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार होते. डॉ. माणिकराव साळुंखे कुलगुरू असताना भारत सरकारकडून त्यांनी टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट मंजूर करून आणले. त्यामुळे आज हे डिपार्टमेंट जोमाने उभा आहे.
पुरस्कार व सन्मान
विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने २००३ साली पद्मश्री किताबाने सन्मान केला.
१९९२ ला वैश्विक इंडस्ट्रीयल रिसर्च अॅवॉर्ड.
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील योगदानासाठी २००६ ला एच. फिरोदिया अॅवॉर्ड. के २०२३ ला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स पदवी








