सरकारने राज्यसभेत दिली माहिती ः 47,112 दशलक्ष युनिटवर पोहोचले उत्पादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाची अणुऊर्जा क्षमता 8 वर्षांमध्ये 40 टक्क्यांनी वाढल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली आहे. भारताच्या अणुऊर्जा क्षमतेत 2014 नंतर मोठी वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये वार्षिक अणुऊर्जा निर्मिती 35,333 दशलक्ष युनिट इतकी होती. 2021-22 मध्ये हे प्रमाण 47,112 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. साडेआठ वर्षांमध्ये अणुऊर्जा क्षमता 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्याचा दावा जितेंद्र सिंह यांनी केला आहे.
2014 पूर्वी देशात केवळ 22 रिऍक्टर्स होते, 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने 7 हजार मेगावॅटची एकूण क्षमता असलेल्या 11 स्वदेशी हेवी वॉटर रिऍक्टर्सच्या निर्मितीला मंजुरी दिली. पंतप्रधान मोदींनी आण्विक कार्यक्रमाला चालना देण्यासाठी संयुक्त उपक्रमाला सरकारी संस्थांसोबत मिळून काम करण्याची अनुमती दिल्याचे सिंह यांनी सांगितले.

पूर्वी देशाचे अणुऊर्जा प्रकल्प हे प्रामुख्याने दक्षिणेतील राज्यांमध्ये किंवा महाराष्ट्र तसेच गुजरात या राज्यांपुरती मर्यादित होते. परंतु मोदी सरकार अणुऊर्जा प्रकल्पांच्या स्थापनेसाठी देशाच्या अन्य हिस्स्यांमध्येही प्रोत्साहन देत असल्याचे म्हणत सिंह यांनी हरियाणात स्थापन होणाऱया अणुऊर्जा प्रकल्पाचे उदाहरण दिले आहे.
युरेनियम 233 चा वापर करणारा जगातील पहिला थोरियम आधारित आण्विक प्रकल्प ‘भवनी’ हा तामिळनाडूच्या कल्पक्कममध्ये स्थापन केला जात आहे. हा पूर्णपणे स्वदेशी आणि अशाप्रकारचा पहिला प्रकल्प आहे. तर थोरियम प्रकल्प कामिनी कल्पक्कम पूर्वीपासूनच अस्तित्वात असल्याचे सिंह यांनी सांगितले आहे.









