भरती परीक्षांची जबाबदारी नाही : संस्थेचे स्वरुप बदलणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नीट, जेईई मेन, सीयूईटी आणि युजीसी नेट यासारख्या महत्त्वपूर्ण परीक्षा आयोजित करविणारी नॅशनल टेस्टिंग एजेन्सीच्या (एनटीए) कामकाजाच्या पद्धतींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी यासंबंधी घोषणा केली आहे. 2025 पासून उच्चशिक्षण संस्थांसाठी एनटीए केवळ प्रवेशपरीक्षाच आयोजित करविणार आहे. एनटीए पुढील वर्षापासून भरती परीक्षा आयोजित करणार नाही. तसेच पुढील वर्षी एनटीएची पुनर्रचना होणार असून संस्थेत 10 नवी पदे निर्माण केली जाणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले आहे.
सरकार नजीकच्या भविष्यात कॉम्प्युटर आधारित परीक्षा आणि तंत्रज्ञान आधारित प्रवेशपरीक्षेच्या दिशेने पाऊल टाकू इच्छिते. वैद्यकीय प्रवेश परीक्षेकरता आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा सुरू आहे. नीट युजी परीक्षा पेन पेपर मोडद्वारे आयोजित केली जावी का ऑनलाइन यावर ही चर्चा होत असल्याचे प्रधान यांच्याकडून सांगण्यात आले.
कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रेंस टेस्ट (सीयूईटी) युजीचे आयोजन वर्षात एकदाच केले जाणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सीयुईटी युजीद्वारेच डीयू, बीएचयू, जामिया, अलाहाबाद विद्यापीठासह देशातील 260 हून अधिक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळतो.
एजेन्सीची 2025 मध्ये पुनर्रचना केली जाणार आहे. कमीतकमी 10 नवे पदे निर्माण केली जाणार आहेत. कुठलीही चूक होऊ नये याकरता एनटीएच्या कामकाजात अनेक बदल केले जाणार आहेत असे प्रधान म्हणाले.
एनटीएकडून आयोजित होणाऱ्या परीक्षा
नीट, जेईई मेन, युजीसी नेट, सीएसआयआर युजीसी नेट, सीयूईटी युजी आणि पीजी, एआयएपीजीईटी, निफ्ट, सीमॅट.
समितीकडून शिफारसी
नीट युजी 2024 आणि युजीसी नेटमधील अनियमितता समोर आल्यावर केंद्र सरकारने एनटीएच्या कार्यशैलीत सुधारणा आणि त्याच्याकडून आयोजित होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्ष संचालन सुनिश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने अनेक सुधारणांची शिफारस केली होती. यात जेईई मेनप्रमाणेच नीट देखील एकाहून अधिक टप्प्यांमध्ये आयोजित करण्याची शिफारस सामील होती.









