युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप : काँग्रेसकडून निलंबित
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
काँग्रेसची विद्यार्थी शाखा एनएसयूआयच्या ओडिशा शाखेच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. भुवनेश्वरच्या एका हॉटेलमध्ये 19 वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले आहे. या कारवाईमुळे काँग्रेसवर चहुबाजूने लक्ष्य करण्यात आल्याने एनएसयूआयचे अध्यक्ष वरुण चौधरी यांनी ओडिशा शाखेच्या अध्यक्षाला तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. काँग्रेसची विद्यार्थी शाखा लैंगिक भेदभावाबद्दल शून्य सहिष्णूतेचे धोरण बाळगत असल्याचा दावा चौधरी यांनी केला.
युवतीवर 18 मार्च रोजी बलात्कार झाला होता. परंतु विद्यार्थिनीने रविवारी मंचेश्वर पोलीस स्थानकात याप्रकरणी तक्रार नोंदविली होती. आरोपी उदित प्रधानने युवतीच्या पेयात गुंगी आणणारा पदार्थ मिसळवत हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
विद्यार्थिनीकडून नेंदविण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर मंचेश्वर पोलीस स्थानकात एफआयआर नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. एनएसयूआय प्रदेशाध्यक्षाने पीडितेला याप्रकरणी खुलासा केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती अशी माहिती भुवनेश्वरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वरंजन सेनापति यांनी दिली आहे.
राजकीय प्रभावामुळे राहिले गप्प
उदित प्रधान हा एनएसयूआयचा प्रदेशाध्यक्ष असल्याने मी गप्प राहिले होते. परंतु आता महिला अधिकारांवर लक्ष देण्यात येत असल्याने मी त्याच्या विरोधात तक्रार नोंदविण्याचे धाडस जमवू शकले असे पीडितेने स्वत:च्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
एनएसयूआय प्रदेशाध्यक्षाच्या समर्थकांची निदर्शने
याचदरम्यान प्रधानला झालेल्या अटकेच्या विरोधात त्याच्या समर्थकांनी पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने केली आहेत. तर ओडिशा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष भक्तचरण दास यांनी प्रधान याच्या विरोधातील आरोपांची चौकशी करणे आणि पीडितेची भेट घेण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष सस्मिता बेहरा यांच्या नेतृत्वात 6 सदस्यीय सत्यशोदान समिती स्थापन केली आहे. ही समिती लवकरात लवकर स्वत:चा अहवाल राज्य काँग्रेस समितीला सोपविणार आहे.









