कठुआमधील मोहीम आणखी तीव्र
वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीरमधील कठुआमधील हिरानगरच्या सान्याल भागात 4 ते 5 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस, लष्कर, निमलष्करी दल आणि एसओजी पथकानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) कमांडो देखील या मोहिमेमध्ये सामील झाले आहेत. संपूर्ण परिसर सुरक्षा दलांनी वेढला असून मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू आहे.
कठुआमधील जंगलभागात दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती मिळताच पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलांनी परिसर सील केला आहे. सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कोणताही संभाव्य हल्ला हाणून पाडण्यासाठी दक्षता घेतली जात आहे. जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांसह सर्व वरिष्ठ अधिकारी मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील सामान्य नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.









