अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफही रशियामध्ये पोहोचणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावाच्या आणि रशियाबद्दलच्या वाढत्या वक्तव्याच्या दरम्यान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल रशियात पोहोचले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’संबंधीच्या टिप्पण्यांनंतर डोवाल यांच्या या भेटीचे महत्त्व आता अधिक धोरणात्मक आणि राजकीय बनले आहे. अजित डोवाल यांचा रशिया दौरा पूर्वनियोजित असला तरीही डोनाल्ड ट्रम्प रशियन तेल आणि संरक्षण उपकरणांच्या खरेदीवरून भारतावर उघडपणे हल्ला करत असताना ते रशियात पोहोचल्यामुळे या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याचदरम्यान, आणखी एका महत्त्वाच्या घडामोडीमुळे राजनैतिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ देखील या आठवड्यात रशियाला पोहोचणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने विटकॉफ यांच्या मॉस्को भेटीची पुष्टी केली आहे. ते रशियन दौऱ्यात विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी चर्चेचा अजेंडा जाहीर करण्यात आला नाही.
डोवाल यांचा रशिया दौरा अनेक पातळ्यांवर अंतर्भूत आहे. एकीकडे संरक्षण सहकार्य आणि ऊर्जा सुरक्षेवर भारत आणि रशियामध्ये तीव्र चर्चा होणार आहे, तर दुसरीकडे हा संदेश देखील स्पष्ट आहे की भारत कोणत्याही जागतिक दबावाखाली आपल्या धोरणात्मक हितांशी तडजोड करणार नाही. डोवाल रशियन सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड बैठक घेतील. याप्रसंगी प्रादेशिक स्थिरता, दहशतवादविरोधी सहकार्य आणि ऊर्जा पुरवठ्यावर चर्चा होणार असल्याचे समजते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरील अलीकडील पोस्टमध्ये भारतावर रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करून ते बाजारात मोठ्या नफ्यावर विकल्याचा आरोप केला आहे. जर भारताने आपले धोरण बदलले नाही तर भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क (टॅरिफ) अनेक पटींनी वाढवण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिल्यामुळे सध्या वेगवेगळ्या चर्चांना उत आला आहे.









