परिसरातील शेकडो भाविकांनी दक्षिणद्वार पवित्र स्नान सोहळ्याचा लाभ घेतला
नृसिंहवाडी : पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततदार पावसामुळे व धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी नरसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पुराचे पाणी आल्याने सकाळी नऊ वाजता चौथा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. दरम्यान, कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर, इचलकरंजी, सांगली आदी परिसरातील शेकडो भाविकांनी दक्षिणद्वार पवित्र स्नान सोहळ्याचा लाभ घेतला.
संततधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रात राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, कोयना, चांदोली धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला आहे. त्यामुळे येथील कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. येथील दत्त मंदिरात पुराचे पाणी आल्याने दत्त मंदिराच्या उत्तर द्वारातून पुराचे पाणी श्रींच्या मुख्य पादुकांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडले.
यादरम्यान, येथे स्नान करणे पवित्र मानले जाते. या पवित्र स्नानाचा नृसिंहवाडी, कुरुंदवाड, इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, सांगली, मिरज, सीमा भागातील कर्नाटकातील भाविकांनी लाभ घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दत्त देवस्थानाने बॅरॅकेट, दोर लावून सुरक्षा व्यवस्था केली होती.
यामुळे दक्षिणद्वार समोर स्नान करणे भाविकांना सोयीचे झाले होते. दत्त मंदिरात दक्षिणद्वार झाल्यानंतर श्रींची उत्सवमूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली. येथे पहाटेची काकड आरती ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत सर्व नित्य उपक्रम पार पडत आहेत.








