गोवा सरकारची ऐतिहासिक-महत्त्वाकांक्षी योजना : गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते आज शुभारंभ
पणजी : डोक्यावर छप्पर असूनही त्याचा मालकी हक्क नसल्यामुळे सतत चिंता आणि भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या हजारो गोमंतकीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न आज सत्यात उतरणार आहे. आज शनिवारी गोवा भेटीवर येणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते राज्य सरकारच्या या ऐतिहासिक आणि तेवढ्याच महत्त्वाकांक्षी योजनेचा औपचारिक शुभारंभ होणार आहे. त्याचबरोबर गोवा दंत महाविद्यालयाची नवी इमारत आणि कांपाल येथील स्मार्ट सिटी स्टेडियम प्रकल्पाचे उद्घाटन, तसेच जुन्ता हाऊस इमारत, ‘प्रशासन स्तंभ’ संकुल, एनबीसीसीकडून पुनर्विकास करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही ते करणार आहेत. ‘माझे घर’ योजना मार्गी लागल्यानंतर सरकारी आणि सामाजिक जमिनीवर बांधलेल्या घरांना मालकी हक्क मिळणार आहेत. त्यामुळे अनेक दशकांपासून घरांची वैध मालकी कागदपत्रे नसलेल्या हजारो कुटुंबांची मालकीसंबंधी असलेली अनिश्चितता दूर होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
1972 पूर्वीची घरे होणार अधिकृत
वेगवेगळ्या झोनमध्ये असलेली सरकारी, कोमुनिदाद किंवा खासगी जमिनीतील वर्ष 1972 पूर्वी बांधण्यात आलेली घरे/बांधकामे ‘सेटलमेंट झोन‘मध्ये असल्याचे गृहीत धरून ती अधिकृत करण्यात येणार आहेत. दि. 28 फेब्रुवारी 2014 पूर्वीची कोमुनिदाद जमिनीतील घरे/बांधकामे अधिकृत करण्यासाठीचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. त्यासाठी फॉर्म 1 खाली अर्ज सादर करावा लगणार असून संबंधीत अर्जाचा नमुना अधिसूचनेसह जारी करण्यात आला आहे.
215 उमेदवारांना मिळणार सरकारी सेवेची नियुक्तीपत्रे
गोवा कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातून सरकारी सेवेसाठी निवडण्यात आलेल्या सुमारे 215 उमेदवारांना गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. त्यायोगे खऱ्या अर्थाने आजपासून त्यांचा सेवाकाळ प्रारंभ होणार आहे.









