अधिक दराने बी-बियाणांची विक्री करणाऱयांवर कठोर कारवाई करणार : विक्रीचा अहवाल द्यावा लागणार
प्रतिनिधी /बेळगाव
आगामी खरीप हंगामात शेतकऱयांना वेळेत बी-बियाणे मिळावीत आणि शेतकऱयांची फसवणूक थांबवावी यासाठी कृषी खाते कृषी सेवा केंद्रावर लक्ष ठेवणार आहे. मागील दोन वर्षात कोरोना आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमिवर कृषी खात्याने हा निर्णय घेतला आहे. याबरोबरच कृषी सेवा केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक देखील सज्ज राहणार आहे. त्यामुळे शेतकऱयांची फसवणूक कमी होणार आहे.
खरीप हंगामादरम्यान मोठय़ा प्रमाणात विविध बी-बियाणांची पेरणी केली जाते. दरम्यान शेतकऱयांची फसवणूकही होत असते. हे रोखण्यासाठी कृषी खात्याने येत्या हंगामात कृषी सेवा केंद्रावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगामादरम्यान बी-बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांची जादा दराने विक्री केली जाते. शिवाय साठवणुकही केली जाते. अशा कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली जाणार आहे.
शेतकरी कृषी सेवा केंद्रातून विविध बी-बियाणांची खरेदी करतात. मात्र पेरणी हंगामाची धांदल सुरू झाल्यानंतर बी-बियाणांचा आणि रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होतो. या संधीचा फायदा घेत कृषी सेवा केंद्रातून अधिक दराने बी-बियाणांची विक्री केली जाते. हंगाम साधण्यासाठी शेतकरी मिळेल त्या दराने बियाणे खरेदी करतात. दरम्यान शेतकऱयांची फसवणूक होते असे प्रकार उघडकीस आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचा इशारा कृषी खात्याने दिला आहे. याबरोबरच कृषी सेवा केंद्राने बी-बियाणे आणि रासायनिक खत विक्रीपूर्वा परवाना नूतनीकरण, साठा व दर फलक लावणे आवश्यक आहे. शिवाय शेतकऱयांनी खरेदी केलेल्या बी-बियाणांची बिले देणे देखील आवश्यक आहे. याबरोबरच विक्रीचा अहवाल अधिकाऱयांना देणे देखील आवश्यक आहे.
विविध उपाययोजना करणार
बी-बियाणे आणि रासायनिक खतामधील भेसळ रोखण्यासाठी कृषी खात्याने विविध उपाय हाती घेतले आहेत. येत्या हंगामात जादा दराने विक्री करणाऱयांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती कृषी खात्याने दिली आहे.
तालुकास्तरावर भरारी पथकाची नियुक्ती करणार
बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी पथक सज्ज ठेवले गेले आहे. येत्या हंगामात बी-बियाणांमध्ये भेसळ आणि जादा दराने विक्री झाल्यास कारवाई केली जाणार आहे. यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची नियुक्ती केली जाणार आहे.
– आर. बी. नायकर (तालुका साहाय्यक संचालक)









