आयुक्त मार्बन्यांग यांच्याकडून नवीन उपक्रमाला चालना
बेळगाव : पोलीस दलाला अधिक सक्रिय व सक्षम बनवण्यासाठी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी साप्ताहिक परेडला फाटा देत वॉक अँड रन उपक्रम सुरू केला आहे. आठवड्यातून दोन वेळा अधिकारी व पोलिसांना घेऊन स्वत: पोलीस आयुक्त शहरातील विविध भागांचा फेरफटका मारत आहेत. पोलीस दलात याआधीपासूनच आठवड्यातून दोन दिवस परेड घेण्याची प्रथा होती. आठवड्याच्या सुरुवातीचा दिवस म्हणून सोमवारी, त्यानंतर शुक्रवारी सकाळी पोलीस परेड मैदानावर परेड घेतला जायचा. याचवेळी शारीरिक व्यायामही केले जायचे. केवळ परेडमुळे बदल होणार नाही म्हणून पोलीस आयुक्तांनी वॉक अँड रनचा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी शहरातील अधिकारी व पोलिसांना घेऊन आयुक्तांनी दहा किलोमीटरची पायपीट केली आहे. सकाळी पोलीस परेड मैदानापासून धावायला सुरुवात केली. सदाशिवनगर, हनुमाननगर, कुवेंपूनगरपर्यंत जाऊन परत पोलीस परेड मैदानापर्यंत आले. वॉक अँड रन उपक्रम सुरू असतानाच एखाद्या प्रशस्त ठिकाणी पोलिसांना थांबवून शारीरिक व्यायामही घेतले जाते. त्यामुळे हा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे. शहरातील बहुतेक अधिकारी व पोलीस या उपक्रमात भाग घेत आहेत. त्यामुळे जनमानसामध्येही या उपक्रमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
पायपीट करण्याला प्राधान्य
अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस आपल्या भागात कसे काय पोहोचले, असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. अधिकारी बदलले तर काही कार्यपद्धतही बदलतात. अनेक अधिकारी आठवडी परेडला प्राधान्य देत होते. सध्याच्या पोलीस आयुक्तांनी मात्र पोलिसांना घेऊन शहराच्या वेगवेगळ्या भागाचा पायपीट करण्याला प्राधान्य दिले आहे.
‘तरुण भारत’ने पोलीस आयुक्तांशी साधला संपर्क
यासंबंधी ‘तरुण भारत’ने पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्याशी संपर्क साधला असता आठवड्यातून सोमवारी व शुक्रवारी असे दोन वेळा परेड घेतले जात होते. यामध्ये बदल करून आपण वॉक अँड रन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात पायपीट केली जात आहे. तेथील समस्या जाणून घेण्यातही हा उपक्रम मदतीचा ठरतो आहे, असे त्यांनी सांगितले.









