पाली मार्गे रस्ता वाहतुकीसाठी खुला : प्रवाशांना दिलासा
वाळपई : ठाणे पंचायत क्षेत्रातून पाली मार्गे रस्ता पूर्ण होऊन वाहतुकीस खुला झाला आहे. यामुळे आता या मार्गाने अवघ्या 70 किलोमीटर अतंर कापून बेळगाव शहर गाठता येणार आहे. यामुळे वाळपईवासियांसाठी ही एक चांगली सोय उपलब्ध झाली आहे. या रस्त्यासाठी स्थानिक आमदार तथा गोवा वनविकास महामंडळाच्या चेअरमन डॉ. देविया राणे यांनी विशेष प्रयत्न केले आहे. यासाठी नागरिकांकडून त्यांना धन्यवाद दिले जात आहेत. दरम्यान, हा रस्ता सध्या पूर्ण झाला असून वाहतुकीसाठी खुला करण्याचा आलेला आहे. मात्र या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे, अशी माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रस्त्यासाठी रु. 4 कोटी खर्च
पाली मार्गे रस्त्याची सुविधा उपलब्ध करण्यात यावी जेणेकरून ठाणे पंचायत क्षेत्रात येत असलेल्या सुरला गावात जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे. त्याचप्रमाणे वाळपई शहरातून सुरला अथवा बेळगावमध्ये जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत फायदेशीर असल्यामुळे तो पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेऊन काम मार्गी लावले. दोन टप्प्यांमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळाली होती. यासाठी जवळपास 4 कोटी खर्च करण्यात आलेला आहे. वाळपई शहरातून कोपार्डे, पाली जांभळीचे तेंब त्यानंतर चोरला, कणकुंबी, जांबोटीमार्गे रस्ता बेळगावपर्यंत जाते.
म्हादई अभयारण्यातून जातो रस्ता
हा रस्ता म्हादई अभयारण्या क्षेत्रातून जात असल्याने धोकादायक मोठे चढ उतार आहेत. यामुळे अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता पेव्हर्स घालून करण्यात आलेला आहे. यावरून अवजड वाहतूक झाल्यास हा रस्ता लवकरच खराब होण्याची भीती आहे. यामुळे अवजड वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे. यामुळे केवळ प्रवासी वाहतूक करण्यात येणार आहे. तीन महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कामाचा आमदार डॉ. देविया राणे यांच्या हस्ते शुभारंभ करून युद्धपातळीवर हे काम पूर्ण केले आहे.
रस्त्यामुळे विकासाला मिळेल चालना :आमदार डॉ देविया राणे
या रस्त्यामुळे या भागातील सार्वजनिक विकासाला चालना मिळणार आहे. विशेषत: सुरला गाव हा ठाणे पंचायत क्षेत्रात आहे. येथील ग्रामस्थांना पंचायत कार्यालयात येण्यासाठी त्याचप्रमाणे वाळपई येण्यासाठी या रस्त्यामुळे सुलभ होणार आहे. निसर्ग पर्यटनासाठीही या रस्त्याचा फायदा होणार आहे. सुरला येथील धबधबा आकर्षक आहे. यामुळे पर्यटकांना पावसाळ्यात या निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. देविया राणे यांनी दिली.









