अलिकडे जगात कशाकशाचे ‘घोटाळे’ केले जातील याची कल्पनाही करणे कठीण आहे. एखादी महिला गर्भवती आहे की नाही, हे अल्ट्रासाऊंड अहवालावरुन कळते. गर्भातील भ्रूणाची स्थिती कशी आहे, हेसुद्धा अल्ट्रसाऊंड तपासणीवरुन समजून येते. त्यामुळे गर्भारपणाच्या काळात या तपासणीला मोठे महत्व असते. अल्ट्रासाऊंड परीक्षणाच्या अहवालाची प्रत संबंधित गर्भवती महिलेला दिली जाते. जपानमध्ये अशी एक घटना उघडकीस आली आहे, की या अल्ट्रासाऊंड अहवालाचाही घोटाळा करण्यात आला आहे.
जपानमधील ‘मर्कारी’ नामक ई-कॉमर्स कंपनीच्या वेबसाईटवर या अहवालांची विक्री होत असल्याची ही घटना आहे. हा गर्भारपण अहवाल 14 डॉलर्सला, अर्थात साधारणत: 1,200 रुपयांना विकला जाऊ लागल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले आहे. हा अहवाल अन्य महिला का विकत घेतात, याचे संशोधन केले असता. पुरुषांची फसवणूक करुन त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी या अहवालाचा उपयोग काही महिलांकडून केला जात असल्याची बाब उघड झाली. ‘तुझ्यापासून मी गर्भवती आहे’ असे हा अहवाल आपल्या मित्राला किंवा आपल्याशी शरीरसंबंध ठेवलेल्या पुरुषाला दाखवून त्याची फसवणूक करण्यासाठी ही महिला इतक्या अधिक किमतीला या अहवाल डाऊनलोड करुन घेतात असे तपास अधिकाऱ्यांना दिसून आले आहे. त्यामुळे या मर्कारी कंपनीची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे.
वास्तविक, कोणत्याही गर्भवती महिलेचा अल्ट्रासाऊंड अहवाल हा खासगी असतो. संबंधित महिला आणि तिचे अगदी निकटचे कुटुंबिय यांखेरीज त्याची माहिती दुसऱ्या कोणालाही दिली जाऊ शकत नाही. डॉक्टरांवरही हे बंधन आहे. ंसंबंधित महिला आणि तिचा पती किंवा जवळचे नातेवाईक सोडून हा अहवाल कोणाच्याही हाती दिला जाऊ शकत नाही. मग या कंपनीला गर्भवती महिलांचे अहवाल मिळाले कसे, याचा शोध घेतला जात आहे. मर्कारी कंपनीने आता आपल्या वेबसाईटवरुन अशा अहवालांची विक्री थांबविण्याचा आदेश दिला असून या अहवालांचा दुरुपयोग काही चलाख महिला करतात, ही बाब उघड झाल्यानंतर कंपनीने कठोर निर्णय घेण्याची घोषणा केली. तथापि, ‘गर्भारपणा’च्या संदर्भातही घोटाळे होऊ लागले, तर अवस्था कठीण आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मिडियावर व्यक्त करत, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.









