आदित्य एल-1’ शनिवारी सकाळी 11:50 वाजता झेपावणार : इस्रोची घोषणा
► वृत्तसंस्था/ .बेंगळूर
सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित भारतीय वेधशाळा ‘आदित्य एल-1’ शनिवार, 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित केली जाईल. या सूर्य मोहिमेसाठी येत्या शनिवारी सकाळी 11.50 ची वेळ निश्चित करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथून याचे प्रक्षेपण होणार आहे. भारताचे ‘आदित्य एल-1’ मिशन सूर्याच्या अदृश्य किरणांचे गूढ आणि सौर उद्रेकातून मुक्त होणारी ऊर्जा आदींचे निरीक्षण करणार आहे.
चंद्र मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 2 सप्टेंबर रोजी सूर्यमोहीम सुरू करणार आहे. ‘आदित्य एल-1’ अंतराळयान सूर्याच्या सर्वात बाहेरील थर (सौर कोरोना) आणि एल-1 (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जियन पॉईंट) वर सौर वाऱ्याचे निरीक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. ‘आदित्य एल-1’ अंतराळयान पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या एल-1 कक्षेत स्थापित केले जाणार आहे. एल-1 हा सूर्य आणि पृथ्वीमधील पहिला लॅग्रेंज पॉईंट असून पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे.
इस्रोच्या मते सूर्य हा आपल्या सर्वात जवळचा तारा आहे. ताऱ्यांच्या अभ्यासात हे आपल्याला सर्वात जास्त मदत करू शकते. यातून मिळालेल्या माहितीमुळे इतर तारे, आकाशगंगा आणि खगोलशास्त्रातील अनेक रहस्ये आणि नियम समजण्यास मदत होईल. सूर्य आपल्या पृथ्वीपासून सुमारे 15 कोटी किमी दूर आहे. ‘आदित्य एल-1’ या अंतरापैकी केवळ एक टक्का अंतर पार करत सूर्याविषयीचा अभ्यास करणार आहे. ‘आदित्य एल-1’ने नोंदवलेल्या निरीक्षणांवरून पृथ्वीवरून सूर्याचा सखोल अभ्यास करण्यास मदत होणार आहे. ही मोहीम अवकाश आधारित निरीक्षण श्रेणीत ठेवण्यात आली आहे.
चार महिन्यांनी ‘एल-1’वर पोहोचणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता चंद्रानंतर सूर्याचा अभ्यास करणार असून ‘आदित्य एल-1’ हे सूर्याचा अभ्यास करणारे पहिले भारतीय मिशन असेल. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल-1 अंतराळयान प्रक्षेपित केले जाईल. हे यान प्रक्षेपणानंतर चार महिन्यांनी सूर्य-पृथ्वी प्रणालीतील लॅग्रेंज पॉईंट-1 (एल-1) वर पोहोचेल. या बिंदूवर ग्रहणाचा प्रभाव पडत नसल्यामुळे सूर्याचा अभ्यास येथून सहज करता येतो. ‘आदित्य एल-1’ उपग्रह सतीश धवन अंतराळ केंद्रात दाखल झाला आहे. हा उपग्रह आता रॉकेटमध्ये स्थापित केला जात असून लवकरच देशवासियांना त्याच्या प्रक्षेपणाचा सुवर्णकाळ पाहता येणार आहे.

‘आदित्य एल-1’मधील महत्त्वाची उपकरणे…
दृश्यमान उत्सर्ज
न रेषा कोरोनाग्राफ (व्हीईएलसी) : हे उपकरण बेंगळूरस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सद्वारे तयार करण्यात आले असून त्याद्वारे सूर्याबाहेरील वातावरण आणि उत्सर्जनातील बदलांचा अभ्यास केला जाईल.
सोलर अल्ट्रा-व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (एसयुआयटी): हे उपकरण पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स द्वारे विकसित करण्यात आले आहे. ते सूर्यप्रकाशातील छाया
चित्रे आणि क्रोमोस्फियरची छायाचित्रे घेईल. ही जवळपास अतिनील श्रेणीतील चित्रे असतील. हा प्रकाश जवळजवळ अदृश्य आहे.
सोलेक्स आणि हेल1ओएस : सौर कमी-ऊर्जा क्ष-किरण स्पेक्ट्रोमीटर (सोलेक्स) आणि उच्च-ऊर्जा एल1 ऑर्बिटिंग क्ष-किरण स्पेक्ट्रोमीटर (हेल1ओएस) यांची निर्मिती बेंगळूर येथील यु. आर. राव उपग्रह केंद्राने केली आहे. सूर्याच्या क्ष-किरणांचा अभ्यास हे त्याचे मुख्य कार्य आहे.
एसपेक्स आणि पापा : भौतिक संशोधन प्रयोगशाळा (अहमदाबाद) द्वारे आदित्य सौर पवन कण प्रयोग (एसपेक्स) आणि तिरुअनंतपुरम येथील साराभाई स्पेस सेंटर
ने प्लाझ्मा अॅनालायझर पॅकेज फॉर आदित्य (पापा) तयार केले आहे. सौर वाऱ्याचा अभ्यास करणे आणि ऊर्जेचे वितरण समजून घेणे हे त्यांचे कार्य असेल.
मॅग्नेटोमीटर (मॅग) : बेंगळूरमधील इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम्स प्रयोगशाळेने मॅग्नेटोमीटर (मॅग) बनविले असून ते एल1
कक्षेभोवतीचे आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्र मोजण्याचे कार्य पार पाडेल.









