कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, गौंडवाड, अलतगा परिसरातील चित्र
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
मृग नक्षत्राला सुरुवात होऊन सात-आठ दिवस झाले तरीसुद्धा कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, गौंडवाड, अलतगा परिसरामध्ये अद्याप भात पेरणीसाठी दमदार पाऊस न झाल्यामुळे गेले दोन दिवस परिसरामध्ये धूळवाफ भात पेरणीबरोबर टोकण पेरणी तुरळक प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी प्रारंभापासूनच कंग्राळी परिसराला वळिवाचा दमदार पाऊस झाला नाही. मध्यंतरी तुरळक प्रमाणात पाऊस झाला. त्यांच्या ओलीवर शेतकरी वर्गाने भात पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली आहे. रोहिणी नक्षत्रही कोरडेच गेले. मृग नक्षत्र तरी पावसाला सुरुवात करेल म्हणून आशेवर असलेल्या शेतकरी वर्गाला मृग नक्षत्रानेही हात दिल्यामुळे शेवटी तुरळक प्रमाणात धूळवाफ पेरणी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावर्षी पावसाचे हवामानच बदलले?
प्रत्येकवर्षी शिमगा सण किंवा पाडवा सणा दरम्यान वळीव पाऊस होत होता. यामुळे शेतकरीवर्गाला पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यास अनुकूल होत होते. परंतु यावर्षी कंग्राळी परिसराला वळीव पावसाने प्रारंभापासूनच हुलकावणी दिली आहे. आज पाऊस पडेल, उद्या पाऊस पडेल या आशेवर राहिलेल्या शेतकरी वर्गाची घोर निराशाच केली आहे.
रोप लागवडीसाठी रोप उगवण्यासाठी भात टाकण्याची धांदल
कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, गौंडवाड, अलतगा परिसरामध्ये जवळजवळ 75 टक्के भातरोप लागवड करतात. माळजमीन किंवा पाण्याचा पाझर नसलेल्या ठिकाणी 25 टक्के भागात भातपेरणी केली जाते. मृग नक्षत्राला सुरुवात झाली तरीसुद्धा अजून दमदार पावसाला सुरुवात न झाल्याने जे शेतकरी विहिरीच्या पाण्यावर विद्युतपंपसेटने पाणी ओढून रोप लागवड करत आहेत. ते शेतकरी विद्युत मोटरने पाणी सोडून भात रोप उगवणीसाठी टाकत आहेत. तसेच पावसाच्या ओलीवर भात रोप उगवण करणारेही शेतकरी भात उगवणीसाठी टाकत असल्याचे दिसून येत आहे.









