‘जय जय शिवराया, श्रम जाती वाया’ या वृत्ताला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : अनेकांनी नोंदविल्या प्रतिक्रिया
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी आत्मपरीक्षण जितके गरजेचे तितकीच कृतिशील पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. 73 चित्ररथ असूनही नागरिकांना त्यांनी तयार केलेले देखावे किंवा प्रसंग पाहता आले नाहीत. संध्याकाळी सुरू झालेल्या मिरवणुकीतील काही चित्ररथ पहाटेपर्यंत रांगेतच थांबून होते. हे चित्र त्वरित बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.
यादृष्टीने विचार करता मंडळांनीसुद्धा काही बदल करणे आवश्यक आहे. बेळगावमध्ये रंगभूषा, वेशभूषाकार संख्येने कमी आहेत. मंडळे दुपारी 2 नंतर मेकअपसाठी बसतात. इतक्मया मंडळातील कलाकारांचे मेकअप करण्यात रंगभूषाकारांना बराच वेळ लागतो. त्यामुळे यावर मंडळांनी तोडगा काढणे अपेक्षित आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मंडळांनी आपल्या प्रसंग सादरीकरणाची वेळ कमी केली पाहिजे.
एखादी नाटिका 45 मिनिटे रंगमंचावर सादर करणे योग्य आहे. पथनाटय़ 10 ते 15 मिनिटांचे असते. नाटक साधारण 3 तासांचे असते. परंतु प्रसंग सादरीकरणाचा कालावधी केवळ 10 मिनिटे असायला हवा. मात्र चित्ररथ मिरवणुकीमध्ये मंडळांनी अर्धा तास सादरीकरण केल्यास मिरवणुकीचे सुसुत्रिकरण बिघडते आणि हळूहळू प्रत्येक मंडळ तितका वेळ घेऊ लागल्याने वेळापत्रक कोलमडते.
झांजपथक, ढोलपथक यामधील सहभागी कलाकार उत्कृष्ट सादरीकरण करतात. त्यांनी स्वतंत्र कार्यक्रम ठेऊन सादरीकरण केल्यास रसिक त्याचाही आस्वाद घेतील. परंतु मिरवणुकीमध्ये 5 ते 7 मिनिटे अशी वेळ त्यांनी पाळली तरीसुद्धा मिरवणुकीला शिस्त लागून मिरवणूक लवकर पुढे सरकेल. पारंपरिक मार्ग हवा ही मागणी फार वर्षांपूर्वी सुसंगतच होती. तेव्हा शहराची लोकसंख्या कमी होती. आता लोकसंख्या आणि औद्योगिकीकरण झाल्याने शहराचे क्षेत्रफळ वाढले नाही. परंतु लोकसंख्या मात्र अफाट वाढली आहे.
त्यामुळे दाटीवाटीच्या अरुंद रस्त्यांवरून मिरवणूक न जाता आता पुन्हा मार्ग बदलाचा विचार करावा लागेल. डीजे लावणाऱया मंडळांना शिवचित्ररथ मिरवणुकीमध्ये सहभागी करून घ्यावे की नाही, याचा विचार महामंडळाने आणि नागरिकांनी सुद्धा करायला हवा. एक-दोन मंडळाच्या न कळत झालेल्या चुकांमुळे शिस्त आणि संयम पाळणाऱया मंडळांवर अन्याय होतो. त्यांचे श्रम आणि मेहनत वाया जाते. त्यामुळे अशा मंडळांनी एकत्र येऊन काही नियमावली स्वतःहून तयार करणे अपेक्षित आहे.
एका डीजेसाठी लाख लाख रुपये खर्च करण्याऐवजी दहा मुलांची दहा हजार रुपये फी मंडळे भरू शकतात. सध्या पीयुसीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नीट, सीईटी अशा वर्गांसाठी असणारी फी भरणे अनेक विद्यार्थ्यांना शक्मय नाही. हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य करणे मंडळांना सहज शक्मय आहे. डीजे लावू नये किंवा त्याचा आनंद घेऊ नये, असे ना महामंडळ म्हणते ना नागरिक म्हणतात. मात्र राष्ट्रप्रेम आणि शिवभक्तीने भारलेल्या मिरवणुकीमध्ये त्यांचा सहभाग असू नये इतकीच अपेक्षा आहे.
मंडळा-मंडळांमधील स्पर्धा ही मिरवणुकीला बाधक ठरत आहे. त्यांचे मंडळ आधी की आमचे मंडळ आधी ही चुरस शिवचित्ररथ मिरवणुकीमध्ये अजिबात नको आहे. निवडणुकांचे राजकारणही या मिरवणुकीपासून पूर्णतः दूर ठेवण्याची गरज आहे. सुज्ञांनी त्याचा विचार करावा. बेळगावचा गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव यांचा लौकिक परराज्यापर्यंत पोहोचला आहे. तो तसाच रहावा आणि वृद्धिंगत व्हावा यासाठी पुढाकार कोण घेणार? हा प्रश्न आहे.
डोळय़ात अंजन घालणारे वृत्त
जय जय शिवराया, श्रम जाती वाया… या शिर्षकाने दि. 6 मे रोजी ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताला वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. तरुण भारतने डोळय़ात अंजन घालणारे वृत्त प्रसिद्ध केले, असे अनेकांनी फोन करून कळविले. दरम्यान, डॉ. विनोद गायकवाड यांनी मिरवणुकीदरम्यान हॉस्पिटलमध्ये गेलो असताना आठवडय़ाची आणि महिन्याची जी बाळे होती त्यांना प्रचंड त्रास होत असल्याचे आपण पाहिले आहे. किमान हॉस्पिटल समोरून जाताना डीजे बंद करण्याचा विवेक मंडळांनी बाळगावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
हे वृत्त वर्मावर बोट ठेवणारे व डोळय़ात अंजन घालणारे आहे. शिवजयंती आणि गणेशोत्सवापूर्वी सर्व मंडळांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे. परवाच्या मिरवणुकीत एका गल्लीचा देखावा दुसऱया दिवशी सकाळी 9 वाजता गणपत गल्लीच्या कोपऱयावरूनच परत गेला. पण त्यांच्या तयारीचा आणि श्रमाचा काय उपयोग झाला? असा प्रश्न अनंत लाड यांनी उपस्थित केला.
बेळगाव शहरात शिवचित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी जनसागर लोटला होता. परंतु युवक आणि युवक मंडळाचे कार्यकर्ते यांनी वेळेचे भान ठेवून मिरवणूक लवकरात लवकर पूर्ण करायला हवी. शिवकालीन सजीव देखावे पाहण्यासाठी शिवप्रेमींची अलोट गर्दी असते. पारंपरिक देखावे, मर्दानी खेळ हे लक्षवेधी ठरतात. परंतु मिरवणूक विस्कळीत झाल्याने या खेळांचा व देखाव्यांचा आस्वाद घेता येत नाही. यासाठी मिरवणुकीची वेळ सायंकाळी 6 ते रात्री 2 एवढीच असावी. जय भवानी, जय शिवाजी घोषणेपुरतेच आपण मर्यादित राहू नये. सर्व मंडळांनी आत्मपरीक्षण करावे, महाराजांवर निष्ठा, प्रेम व भक्ती असेल तर त्यांचे विचार व तत्त्व आचरणात आणले पाहिजे, अशी प्रतिक्रिया तेजस्वी मोतेस महिला मंडळाच्या अध्यक्षा नवती देसाई यांनी दिली
आहे.
तरुण भारतने उचलून धरलेला मुद्दा डोळे उघडणारा आहे. सर्वांनीच विचार करण्याची वेळ आली असून असे समाज प्रबोधन केल्याबद्दल प्रकाश कामत यांनी तरुण भारतचे अभिनंदन केले आहे. कळीच्या प्रश्नावर नेमके भाष्य केल्याची प्रतिक्रिया तेजराज किंकर यांनी दिली आहे. अशाच आशयाच्या प्रतिक्रिया अनेक वाचकांनी दिल्या आहेत.









