एकजुटीने लढा देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
प्रतिनिधी / बेळगाव
खानापूर येथील मराठी फलक हटविल्यानंतर आता येळ्ळूर येथीलही मराठी फलक हटविण्याचा आटापिटा सुरू करण्यात आला आहे. बुधवारी अचानक ग्राम पंचायतीवर दबाव आणून प्रत्येक गल्लीमध्ये लावलेले नावांचे फलक काढण्यात आले. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आता त्या विरोधात लढा देण्याचा निर्धार केला आहे. मराठी भाषिक तरुणांनी या राष्ट्रीय पक्षांचा कुटिल डाव ओळखून आता तरी म. ए. समितीच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहन करण्यात आले आहे. येळ्ळूर गाव हे 100 टक्के मराठी भाषिक आहे. त्यामुळे कन्नड कोणालाच समजत नाही. त्यामुळे मराठीतच फलक लावण्यात आले होते. गल्लीतील दिशावर्धक फलक तसेच गल्लींची नावे असलेले फलक मराठीत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाला त्याचा पोटशूळ उठले आहे.
बुधवारी अचानकपणे येवून ते फलक हटवावे, यासाठी ग्राम पंचायतीवर दबाव आणण्यात आला. त्यानंतर हे फलक सध्या काढून ठेवण्यात आले आहेत. त्या फलकावरील 60 टक्के भाग कन्नडसाठी राखीव ठेवावा. उर्वरित भागामध्ये मराठी किंवा इतर भाषेमध्ये लिहा, असे सांगण्यात आले. कर्नाटकात असल्यामुळे स्थानिक भाषेला प्राधान्य दिलेच पाहिजे, असे सांगून मराठी भाषिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर तरी आता राष्ट्रीय पक्षामध्ये गेलेल्या मराठी तरुणांनी विचार करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. आपल्या माय बोलीवरच अशा प्रकारे घाला घातला जात आहे. त्यांनी आता आपल्याच उमेदवारांना विचारावे की काय चालले आहे? अशी मागणीदेखील होत आहे. म. ए. समितीमुळेच आजपर्यंत सीमाभागामध्ये मराठी भाषा टिकून आहे. मात्र मराठी भाषिक असलेले तरुण राष्ट्रीय पक्षांच्या आमिषांना बळी पडत आहेत. तेव्हा वेळीच विचार करावा आणि आता तरी शहाणे होवून एकजुटीने म. ए. समितीच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









