वनमंत्री उमेश कत्ती यांची माहिती ः ड्रोनद्वारे शोध सुरु ः हूरहूर कायम
प्रतिनिधी/ बेळगाव
नियोजनाअभावी हातातून निसटलेल्या बिबटय़ासाठी शोधमोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मंगळवारी रेसकोर्सच्या परिसरात ड्रोन कॅमेऱयाच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली. शिवाय रेसकोर्सच्या मैदानात बिबटय़ा शोधासाठी हत्तींचा वापर केला जाणार आहे. यासाठी शिमोगा अभयारण्यातील हत्ती पथकाला पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती वनमंत्री उमेश कत्ती यांनी दिली आहे.
रेसकोर्सच्या परिसरात 19 दिवसांपासून दहशत माजविलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी वनखाते आणि पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. सोमवारी हातात आलेला बिबटय़ा वनखात्याच्या बेजबाबदारपणामुळे निसटला आहे. त्यामुळे नियोजनाअभावी बिबटय़ा हातातून निसटल्याचेही समोर आले आहे. यामुळे वन्यप्रेमी आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
श्वान पथकाला अपयश
बिबटय़ा हातून निसटल्यानंतर सोमवारी सायंकाळी रेसकोर्स परिसरात हुक्केरी येथील मुधोळ जातीच्या श्वान पथकाला प्राचारण करण्यात आले होते. मात्र बिबटय़ाचा शोध लागला नाही. त्यामुळे मंगळवारी बिबटय़ाच्या शोधासाठी शिमोगा येथून हत्तींच्या पथकाला प्राचारण करण्यात आले आहे. त्यामुळे आता रेसकोर्सच्या मैदानात बिबटय़ाच्या शोधासाठी ड्रोन कॅमेरे, मुधोळ श्वान आणि हत्ती देखील उतरणार आहेत. त्यामुळे हत्तींच्या माध्यमातून बिबटय़ाचा शोध लागणार का? हेच पहावे लागणार आहे.

बेजबाबदारपणा, गांभीर्य आणि नियोजनाअभावी सोमवारी बिबटय़ा सहजासहजी वनखात्याच्या हातातून निसटला. काही क्षणातच बिबटय़ाने क्लब रोड ओलांडून रेसकोर्समध्ये पलायन केले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बिबटय़ाला पकडलेच पाहिजे. या मनस्थितीत असलेल्या वनखाते आणि पोलीस खात्याच्या कर्मचाऱयांची मात्र घोर निराशा झाली. सोमवारच्या शोध मोहीमेनंतर वनखात्याला किती गांभीर्य आहे. हे पुन्हा एकदा समोर आले आहे. शिवाय आता बिबटय़ा नजरेला पडल्यास पूर्ण तयारीनिशीच उतरावे लागणार आहे. नाही तर पुन्हा बिबटय़ा चकवा देणार आहे. हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वनखाते आणि पोलीस यंत्राणा बिबटय़ाला पकडण्यासाठी कोणती कारवाई करणार? याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे.
मल्लिनाथ कुसनाळ (एसीएफ वनखाते)
बिबटय़ा पकडण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. ड्रोन कॅमेरा आणि श्वान पथकाच्या माध्यमातून शोध मोहीम सुरु आहे. शिवाय शिमोगा येथील हत्ती पथकाला देखील प्राचारण करण्यात आले आहे. रेसकोर्स परिसरात बिबटय़ा उपजिविकेसाठी इतर लहान प्राणी व पाण्याची व्यवस्था असल्याने तो त्या ठिकाणीच आसरा घेऊन आहे.









