भारत सरकारकडून यूएसबी टाईप-सी चार्जिंगची लवकरच व्यवस्था ः ई कचऱयाच्या समस्येवर उपाय
नवी दिल्ली
भारत सरकार मोबाईल आणि वेअरेबल इलेक्ट्रनिक उपकरणांसाठी दोन कॉमन चार्जिंग पोर्ट सुरु करण्याची योजना आखत आहे. यामध्ये एक मोबाईल, स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी युएसबी टाईप-सी चार्जर येणार आहे. अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी सामान्य चार्जर राहणार आहे. त्यामुळे भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) यांनी युएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्टसाठी गुणवत्ता मानके सादर केली आहेत.
भागधारकांनी युएसबी टाईप-सी चार्जर स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. यानंतर बीआयएस यांनी गुणवत्ता मानके सादर केली आहेत. त्याचवेळी, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) कानपूर येथे घडय़ाळांसारख्या वेअरेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी सिंगल चार्जिंग पोर्टचा अभ्यास केला जात असल्याची माहिती ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच या संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर, ग्राहक क्यवहार विभाग (बीआयएस) उद्योग क्षेत्रातील भागधारकांशी चर्चा करणार असल्याचेही म्हटले आहे.
सामान्य चार्जिंग पोर्ट टप्या-टप्यात होणार लागू
देशात फक्त दोन प्रकारचे चार्जिंग पोर्ट अनिवार्य करण्याबद्दल सिंग म्हणाले, ‘आम्हाला युरोपियन युनियनच्या 2024 च्या अंतिम मुदतीचे पालन करावे लागेल. याचे कारण असे, की मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांची पुरवठा साखळी जागतिक आहे. ते फक्त त्याची विक्री करत नाही.’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
कोणत्या देशांनी लागू केलाय नियम?
युरोपीय संघ म्हणजे इयू मध्ये यावर सहमती झाली असून वर्ष 2024 मध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी एकाच चार्जरचा वापर करण्यात येणार आहे. 2024 पर्यंत युएसबी टाईप-सी युरोपीयन संघामध्ये सर्व मोबाईल फोन, टॅब्लेट आणि कॅमेऱयासह इतर उत्पादनकांकरीता चार्जिंग पोर्टची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
टाईप-सी चार्जर वापरणारे ब्रँड
सॅमसंग, शाओमी, ओप्पो, विवो आणि रियलमी, मोटोरोला यांनी टाइप-सी पोर्ट चार्जरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. टाईप-सी आणि चार्जरची किमतीचा विचार केल्यास ही किमत 100 ते 150 रुपयांपासून सुरु होत आहे.
ऍपलचा टाईप-सी चार्जिंग पोर्ट पुढील वर्षात
अँड्रॉईड इकोसिस्टम हळूहळू युएसबी टाइप-सी इकोसिस्टमच्या बाजूने प्रवास करत आहे. जवळपास सर्व नवीन स्मार्टफोनला चार्ज करण्यास व अन्य कनेक्टिव्हिटीसाठी हा पर्याय देण्यात आला आहे.
सरकार का आणत आहे टाईप-सी चार्जर?
साधारणपणे मागील वर्षात नोव्हेंबरमध्ये ग्लासगो येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र जलवायु परिवर्तन संमेलन म्हणजे सीओपी 26 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाप्रती प्रत्येकाने योगदान देण्याची गरज व्यक्त केली होती. सरकार सलगपणे ई कचऱयावर काम करत असल्याचेही तेव्हा स्पष्ट केले होते. विविध उपकरणांसाठी लागणाऱया चार्जिंगसाठी वेगवेगळय़ा चार्जरची निर्मिती केली जाते. ती वाढल्याने ई कचराही वाढत जात आहे. यामुळेच सरकार विविध उपकरणांसाठी एकच चार्जरचा पर्याय आणत आहे.









