शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांचे सुतोवाच : गीता प्रेसच्या कार्यातून मानवी मूल्यांचे जतन
► वृत्तसंस्था/ गोरखपूर
गीता प्रेससारखी संस्था भारताला जोडण्याचे काम करते. देश अमृत महोत्सव साजरा करत असताना गीता प्रेसने 100 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. देश विकास आणि वारसा घेऊन पुढे जात आहे. अनेक शतकांनंतर अयोध्येत राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होत आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याची आणि आपल्या परंपरेचा अभिमान बाळगण्याची हीच वेळ आहे. आता देश राजपथावर नसून खऱ्या अर्थाने कर्तव्यपथावर असल्याचे सुतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गोरखपूरमधील गीता प्रेसच्या शताब्दी वर्षाच्या समारोप समारंभाला उपस्थित होते. गीता प्रेस ही केवळ संस्था नसून जिवंत विश्वास असलेले ते जगातील एकमेव मुद्रणालय आहे. गीता प्रेससारख्या संस्थांचा जन्म मानवी मूल्यांचे जतन करण्यासाठी झाला आहे, असे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले. गीता प्रेसचे कार्यालय कोट्यावधी लोकांसाठी मंदिरापेक्षा मोठे आहे. त्याच्या नावात आणि कामात गीता आहे. जिथे गीता आहे, तिथे कृष्ण आहे… तिथे कऊणा आहे… तिथे ज्ञान आहे…. विज्ञान आहे… आणि संशोधनही असल्याचे ते पुढे म्हणाले.
गीता प्रेसमधून कोट्यावधी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ही पुस्तके कमी किमतीत विकली गेली. येथे छापण्यात आलेली पुस्तके घरोघरी आहेत. येथील पुस्तकांनी कित्येक लोकांना समर्पित नागरिक बनवले आहे. अशा लोकांना मी सलाम करतो, असेही पंतप्रधान म्हणाले.









