वृत्तसंस्था /मुंबई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)ने चेक क्लिअरिंग सायकल कालावधी टी+1 दिवसावरून काही तासांत कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 8 ऑगस्ट रोजी पतधोरण समितीच्या बैठकीदरम्यान या संदर्भात ही माहिती दिली आहे. चेक ट्रंकेशन सिस्टम सध्या 2 कामकाजाच्या दिवसांच्या क्लिअरिंग सायकलसह चेकवर प्रक्रिया करते. यासाठी बॅच क्लिअरिंगचा दृष्टिकोन अवलंबला जातो, तो सतत क्लिअरिंगमध्ये बदलला जाणार आहे. म्हणजेच, चेक क्लिअरिंग प्रक्रिया व्यवसायाच्या वेळेत सतत चालू राहणार आहे.
लवकरच नवीन मार्गदर्शक तत्वे….
चेक ट्रंकेशन सिस्टममध्ये, चेक स्कॅन केला जातो, सादर केला जातो आणि पास केला जातो. आरबीआय लवकरच या नवीन प्रणालीबद्दल तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. खातेधारकांना काही तासांतच निधी मिळणार आहे. काही तासांत खातेधारकांना निधी प्राप्त होणार असल्याने ग्राहकांचे समाधान होणार आहे. या बदलामुळे चेक-आधारित व्यवहारांशी संबंधित अनिश्चितता कमी होण्याची शक्यता आहे.आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 6 ऑगस्टपासून सुरू असलेल्या पत धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ही बैठक दर दोन महिन्यांनी असते. आरबीआयच्या पतधोरण समितीत 6 सदस्य आहेत. गव्हर्नर दास यांच्यासोबत, आरबीआयचे अधिकारी राजीव रंजन हे कार्यकारी संचालक म्हणून काम करतात आणि मायकेल डेब्राट पात्रा डेप्युटी गव्हर्नर आहेत. शशांक भिडे, आशिमा गोयल आणि जयंत आर वर्मा हे बाह्य सदस्य आहेत.
चेक ट्रंकेशन सिस्टम म्हणजे काय?
चेक ट्रंकेशन सिस्टम ही चेक क्लिअर करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये दिलेला भौतिक धनादेश एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवावा लागत नाही, तर धनादेशाचा फोटो काढून तो क्लिअर केला जातो. वास्तविक जुन्या प्रणालीमध्ये धनादेश बँकेला सादर केला जातो जिथून धनादेश संबंधीत दुसऱ्या बँकेच्या शाखेत पाठविला जातो. अशा प्रकारच्या प्रक्रियेत तो चेक क्लिअर व्हायला वेळ लागतो.









