इंग्लंडविरुद्धची ‘टी-20’ नि ‘वनडे’ मालिका जिंकल्यानंतर आता भारताला वेध लागलेत ते ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धेत झेंडा फडकविण्याचे अन् विक्रमी तिसऱ्यांदा किताब पटकावण्याचे…ही स्पर्धा ‘आयसीसी’नं पुन्हा सुरू केलीय अन् ती शेवटची खेळविण्यात आली होती 2017 साली. त्यामुळं यावेळच्या मोहिमेला जास्तच महत्त्व लाभलेलं असून भारतीय संघ हा चषकाच्या सर्वांत प्रबळ दावेदारांपैकी एक…
स हसा भारतीयांची स्मृती ही फारशी टिकणारी नसते…आपल्याकडील क्रिकेट रसिकांची तर खूपच कमी…त्यामुळं अवघ्या काही महिन्यांपूर्वी आपण न्यूझीलंडनं मायभूमीत दिलेला ‘क्लिन स्वीप’चा दणका अन् ऑस्ट्रेलियाच्या भूमीत वाट्याला आलेली नामुष्की यामुळं भारतीय संघाच्या नावे कडाकडा बोटं मोडू लागलो होती याची आठवणही राहिलेली नसेल…कारण आधी सूर्यकुमार यादवच्या संघानं ‘टी-20’ मालिकेत अन् नंतर रोहित शर्माच्या चमूनं एकदिवसीय सामन्यांत इंग्लंडला पुरतं लोळवण्याचा, ‘बाझबॉल’वाल्या इंग्रजांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा केलेला पराक्रम. असं काही घडलं की, आपल्याकडे जल्लोष सुरू व्हायला वेळ लागत नाहीये…
असं असलं, तरी आपली खरी कसोटी आता लागेल ती येत्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत…या स्पर्धेच्या जेतेपदासाठीच्या सर्वांत मजबूत दावेदारांपैकी एक आहे तो भारत. परंतु यावेळी आपल्याला मुख्य अस्त्र जसप्रीत बुमराहविना मैदानात उतरावं लागेल. ऑस्ट्रेलियात झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळं मागच्या दोन्ही मालिकांना मुकलेला बुमराह ‘चॅम्पियन्स’साठी तंदुरुस्त होऊ शकणार नाही हे स्पष्टपणे जाणवत होतं अन् तसंच झालंय. त्याच्या गैरहजेरीत देखील आपण इंग्लंडची दाणादाण उडविलीय हे खरं असलं, तरी जसप्रीतची उपस्थिती पारडं आणखी भक्कम बनवून गेली असती…
चॅम्पियन्स चषकासाठी निवडलेल्या संघावरून एक नजर फिरविल्यास तो मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या भरपूर जोखीम घेण्यास मागंपुढं न पाहण्याच्या धोरणाशी पुरेपूर जुळणारा…पाच फिरकीपटू निवडणं हे त्या दिशेनं पहिलं पाऊल…अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वऊण चक्रवर्ती नि रवींद्र जडेजा…भारताचे सारे सामने दुबईमध्ये होतील, कारण पाकिस्तानमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव जाण्यास आपण स्पष्टपणे नकार दिलाय आणि त्या देशातील एकंदर वातावरण बघितल्यास ते शंभर टक्के योग्य. परंतु दुबईच्या खेळपट्टीची जातकुळी वरील निर्णयाशी सुसंगत आहे का ?…
दुबईतील एकदिवसीय सामन्यांमध्ये आजवर पारडं जड राहिलंय ते वेगवान गोलंदाजांचं. भारताचे सामने हे दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळविले जातील. 2009 पासून तिथं वेगवान गोलंदाजांनी 28.6 च्या सरासरीनं घेतलेत 466 बळी, तर फिरकीपटूंनी 30 धावांच्या सरासरीनं बाद केलंय ते 334 फलंदाजांना…काही जाणकारांच्या मते, दुबईची खेळपट्टी ही शारजाहपेक्षा वेगळी. म्हणूनच पाकिस्तान जरी त्या ठिकाणी अवघेच सामने खेळणार असला, तरी त्यांनी त्यांच्या संघात अधिक वेगवान गोलंदाजांची भरती केलीय. या पार्श्वभूमीवर मोहम्मद सिराजसारखा अनुभवी वेगवान गोलंदाजाचा समावेश अधिक उपयुक्त ठरला असता…
निवड समितीनं बुमराहच्या जागी गौतम गंभीरच्या आवडत्या हर्षित राणाचा समावेश केलाय, तर सिराजला अष्टपैलू शिवम दुबे व धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैस्वालसह टाकण्यात आलंय ते राखीव खेळाडूंत…भारताला साखळी फेरीत तीन संघांचा मुकाबला करावा लागेल. तरीही राणाला बुमराहचा पर्याय ठरवून संघात स्थान देणं हे कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय…परंतु कर्णधार रोहित शर्माच्या मते, सिराजला वगळण्यात आलंय ते जुन्या चेंडूवर फारसा प्रभावी मारा करता येत नसल्यानं. दुसरीकडे, पांढऱ्या चेंडूनं चमक गमावल्यानंतरही आपण भेदक ठरू शकतो हे राणानं यापूर्वी दोनदा दाखवून दिलंय…
हर्षित राणा हा त्याच्या ‘टी-20’ पदार्पणावेळी सहाव्या क्रमांकावरील गोलंदाज होता आणि शिवम दुबेच्या ऐवजी त्याची त्यावेळी करण्यात आलेली निवड ही काहीशी वादग्रस्तही ठरल्याशिवाय राहिली नव्हती. मात्र त्यानं त्यात 33 धावांत 3 गडी बाद करून सामन्याचं स्वरुप बदलण्यात मोलाचा वाटा उचलला…राणा एकदिवसीय सामन्यांमध्ये काहीसा महागडा ठरलेला असला, तरी तीन वेगवेगळ्या टप्प्यांत तीन स्पेल टाकण्याचं धैर्य देखील त्यानं दाखविलंय. शिवाय इंग्लंडविरुद्धच्या प्रत्येक सामन्यात त्यानं बळी मिळविले हेही नजरेआड करता येणार नाही (पहिल्या लढतीत 53 धावांत 3, दुसऱ्या सामन्यात 62 धावांत 1 अन् तिसऱ्या खेपेला 31 धावांत 2 बळी)…
बुमराहची उणीव काही प्रमाणात भरून काढताना संघात एक गूढ गोलंदाज हवा अशी निवड समितीची धारणा बनलेली असावी. त्यामुळं वर्णी लागली ती फिरकीपटू वरुण चक्रवर्तीची…दुबईतील एकंदर परिस्थिती पाहता पाच फिरकीपटू घेऊन जाण्याचा डावपेच कितपत फळेल याविषयी शंका असली, तरी चक्रवर्तीला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय तो अलीकडच्या उत्कृष्ट फॉर्ममुळं…तो खरं तर याच ठिकाणी 2021 च्या ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. पण त्यावेळी त्याला चमक दाखविता आली नव्हती. मात्र यावेळी वरुण चक्रवर्ती बदललेला असून तो चांगली कामगिरी करेल असा विश्वास निवड समितीला वाटतोय…नुकत्याच संपलेल्या मायदेशातील मालिकांत वरुणनं इंग्लंडला ज्या प्रकारे अडचणीत आणलं त्यानं हा विश्वास दृढ करण्याचंच काम केलंय…
खेरीज भारताच्या गटात आहेत ते बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ. त्यांनी यापूर्वी कधीही वरुणचा सामना केलेला नाही. ही वस्तुस्थिती देखील त्याला झुकतं माप देण्यास कारणीभूत ठरलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही…मात्र त्याच्या समावेशामुळं कुलदीप यादवचं स्थान धोक्यात येऊ शकतं. कारण फलंदाजीच्या ताकदीमुळं रवींद्र जडेजा नि अक्षर पटेल यांना पसंती लाभेल हे सांगण्यासाठी कुणा तज्ञाची गरज नाहीये. त्यामुळं तिसऱ्या फिरकीपटूसाठीच्या स्थानाकरिता शर्यत राहील ती कुलदीप व चक्रवर्तीमध्ये…
फॉर्मात असलेल्या वरुण चक्रवर्तीला निवडण्याविषयी काहीच वाद नसला, तरी सलामीवीर यशस्वी जैस्वालला वगळून त्याला घेण्याचा निर्णय घेणं हे मात्र अनाकलनीय. चक्रवर्तीसाठी जागा निर्माण करताना वॉशिंग्टन सुंदरला डच्चू देता आला असता…नागपूरमधील इंग्लंडविऊद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जैस्वाल जरी अपयशी ठरलेला असला, तरी त्याच्यात लपलेली ताकद पाहता त्याला वगळणं समर्थनीय वाटत नाही. अर्थात जैस्वाल आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही एकाच संघात बसविणं कठीण अन् श्रेयसनं सतत आपल्या बॅटचा इंगा दाखवून आपल्याला वगळणं किती अयोग्य होतं ते पुरेपूर सिद्ध केलंय (पहिल्या लढतीत या दोघांनाही सामावून घेता आलं होतं ते विराट कोहलीला दुखापत झाल्यानं)…
इंग्लंडविऊद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन अर्धशतकं नि एक शतक अशी तडाखेबंद कामगिरी केलेला शुभमन गिल अन् कटकमध्ये शतक झळकावून आपला ‘बॅड पॅच’ बऱ्याच काळानंतर दूर केलेला रोहित यांच्याकडून आता ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मध्ये वाढीव अपेक्षा असतील. त्याचप्रमाणं ‘वनडे’मध्ये 14 हजार धावांचा टप्पा गाठण्याच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचलेला विराट कोहली मधल्या फळीतील खेळाडूंवर दबाव आणण्याऐवजी त्यांना दिलासा देईल अशी आशा केवळ संघ व्यवस्थापनालाच नव्हे, तर साऱ्या भारतीय रसिकांना असेल…
याव्यतिरिक्त मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा अशा तीन वेगवान गोलंदाजांना निवडण्यात आलेलं असल्यानं तिसऱ्या जलद गोलंदाजाच्या जबाबदारीचा भार हार्दिक पंड्याला तितका पेलावा लागणार नाही. त्यामुळं त्याच्या तंदुरुस्तीविषयी वरचेवर उफाळून येणाऱ्या समस्यांचा तडाखा स्पर्धेवेळी बसण्याचा धोकाही कमी…भारतानं संघ निवड करताना बऱ्यापैकी जोखीम पत्करलीय. मात्र तितक्या प्रमाणात फळ मिळू शकेल का ?….लवकरच याचं उत्तर मिळेल. कारण घेडामैदान फारसं दूर नाहीये !
भारताची ‘चॅम्पियन्स’मधील वाटचाल…
भारत हा दोन वेळचा विजेता…2002 (संयुक्त विजेता) नि 2013 मध्ये…तर 2000 व 2017 साली आपल्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं…
- 1998 : पहिली स्पर्धा झाली होती ती बांगलादेशमध्ये अन् ‘आयसीसी नॉकआऊट ट्रॉफी’ म्हणून ओळखल्या गेलेल्या त्या स्पर्धेत मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला उपांत्य फेरीत धक्का दिला तो वेस्ट इंडिजनं…
- 2000 : कर्णधार सौरव गांगुलीनं शतक झळकावूनही नैरोबीत झालेल्या त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला न्यूझीलंडकडून 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला…
- 2002 : कोलंबोतील अंतिम सामना पावसात वाहून गेल्यानं भारत नि श्रीलंकेला संयुक्त विजेते घोषित करण्याचा प्रसंग आला. त्यापूर्वी भारतानं साखळी स्तरावर पराभूत केलं होतं ते झिम्बाब्वे नि इंग्लंडला, तर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला…
- 2004 : ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ असं नामकरण झालं ते यावर्षी अन् भारतानं तोवरची सर्वांत खराब कामगिरी नोंदविली ती देखील याच स्पर्धेत. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानं साखळी फेरीतच ते गारद झाले…
- 2006 : वेस्ट इंडिज नि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत होऊन भारत सलग दुसऱ्यांदा साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर पडला…
- 2009 : पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच सामन्यात पराभव, त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत पावसात वाहून गेली. या पार्श्वभूमीवर सलग तिसऱ्यांदा साखळी फेरीतच आव्हान गारद होण्याची पाळी…
- 2013 : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघानं चषक उचलला तो इंग्लंडला 5 गडी राखून नमवून…बर्मिंगहॅममधील हा अंतिम सामना पावसामुळं 20 षटकांचा करण्यात आला…
- 2017 : शेवटच्या चॅम्पियन चषक स्पर्धेत विराट कोहलीच्या अधिपत्याखालील संघाचं स्वप्न भंगलं ते लंडनमधील ओव्हलवरील अंतिम लढतीत पाकिस्ताननं 10 गडी राखून नमविल्यानं…
आतापर्यंतचे विजेते व उपविजेते…
साल विजेते उपविजेते
- 1998 दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज
- 2000 न्यूझीलंड भारत
- 2002 श्रीलंका भारत
- 2004 वेस्ट इंडिज इंग्लंड
- 2006 ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज
- 2009 ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड
- 2013 भारत इंग्लंड
- 2017 पाकिस्तान भारत
– राजू प्रभू









