भटिंडा तळावर तैनात होणार ‘हर्मीस-900 स्टारलाइनर’: पाकिस्तानसह पश्चिम सीमेवर ठेवणार नजर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हर्मीस-900 स्टारलाइनर ड्रोन येत्या आठवड्यात भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या भारतीय सीमेवर पाळत ठेवण्यासाठी हे ‘दृष्टी-10’ ड्रोन मदत करेल. या ड्रोनमध्ये 30 तासांपेक्षा जास्त काळ उ•ाण करण्याची क्षमता आहे. ते शनिवार, 18 मे रोजी हैदराबादमध्ये भारतीय लष्कराला प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले. लष्कराला मिळणारे हे पहिलेच ड्रोन आहे. यापूर्वी पहिले हर्मीस-900 भारतीय नौदलाला जानेवारीत सुपूर्द करण्यात आले होते.
भारतीय लष्कर आपल्या भटिंडा तळावर दृष्टी-10 ड्रोन तैनात करेल. या तळावरून ते पाकिस्तानच्या संपूर्ण पश्चिम सीमेवर लक्ष ठेवण्यास सक्षम असेल. यानंतर तिसरे ड्रोन नौदलाला आणि चौथे ड्रोन लष्कराला दिले जाणार आहेत. भारतीय लष्कराकडे आधीपासून हेरॉन मार्क 1 आणि मार्क 2 ड्रोन वापरात असली तरी मेक इन इंडिया अंतर्गत सैन्याने दृष्टी-10 किंवा हर्मीस-900 ड्रोन्सची ऑर्डर देखील दिली आहे. भारताशिवाय चिली, पॅनडा, अझरबैजान, मेक्सिको, ब्राझील, कोलंबिया, फिलीपिन्स आणि स्वित्झर्लंडकडेही हे ड्रोन आहेत.
आर्मी एव्हिएशन कॉर्प्स चीन-पाकिस्तान सीमेवर नवीन एव्हिएशन ब्रिगेड तैनात करणार आहे. सीमेवर सध्या तीन ब्रिगेड कार्यरत आहेत. एका ब्रिगेडमध्ये 50-60 हेलिकॉप्टर असतात. त्यांचे काम वैद्यकीय निर्वासन, तोफखाना-लॉजिस्टिक आणि हल्ला प्रदान करणे आहे. अदानी समूहाच्या कंपनीने भारतीय सुरक्षा दलासाठी स्वदेशी ड्रोन बनवले आहे. या स्वदेशी ड्रोनला ‘युएव्ही दृष्टी-10’ असे नाव देण्यात आले आहे.
भारताने उत्तर सेक्टरमधील फॉरवर्ड एअरबेसवर प्रगत हेरॉन मार्क-2 ड्रोन तैनात केले आहेत. हे ड्रोन लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. याशिवाय एकाच फ्लाईटमध्ये चीन-पाकिस्तान या दोन्ही सीमांवर नजर ठेवता येते. हेरॉन मार्क-2 ड्रोन इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने बनवले आहेत. याच्या मदतीने एकाच फ्लाईटमध्ये अनेक मोहिमा राबवल्या जाऊ शकतात आणि एकाचवेळी अनेक क्षेत्रांवर लक्ष ठेवता येते.









