स्पाईस जेटकडून बुकिंग सुरू : तिकीट दर कमी केल्याने बुकिंग करणाऱयांची संख्या वाढली
प्रतिनिधी /बेळगाव
देशाची राजधानी असणाऱया दिल्ली शहराला आता पुन्हा एकदा दररोज प्रवास करता येणार आहे. स्पाईस जेट कंपनीने बुकिंग सुरू केले असून, आता दररोज प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांमधून आनंद व्यक्त होत आहे. अवघ्या अडीच तासांत बेळगावहून दिल्लीला पोहोचता येणार आहे.
मध्यंतरी स्पाईस जेट कंपनीच्या तांत्रिक कारणामुळे अनेक विमानफेऱया रद्द झाल्या. याचा परिणाम प्रवाशांवर होत गेला. त्यामुळे प्रवासी संख्येत घट झाली. काही दिवसांपूर्वीच हिवाळी वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर बेळगाव-दिल्ली विमानसेवा आठवडय़ातून तीन दिवस करण्यात आली. परंतु या निर्णयाविरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त केला. विमानसेवा सुरळीत पद्धतीने सुरू झाल्यास प्रवासी संख्याही वाढेल, असे मत प्रवाशांमधून व्यक्त होत होते.
कंपनीतील तांत्रिक कारण दूर झाल्यानंतर आता पुन्हा एकदा दररोज विमान सुरू ठेवण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. सकाळी 9 वा. बेळगावहून निघालेले विमान सकाळी 11.25 वा. दिल्लीला पोहोचते तर सकाळी 6.10 वा. दिल्ली येथून निघालेले विमान सकाळी 8.30 वा. बेळगावला पोहोचते. त्यामुळे अवघ्या अडीच तासांत बेळगाव-दिल्ली असा विमान प्रवास करता येवू शकतो.
5 हजार 499 मध्ये करा प्रवास
स्पाईस जेट कंपनीकडून बेळगावमधील ग्राहकांसाठी तिकीट दर कमी केले आहेत. मध्यंतरी तिकीट दर 7 हजारांवर पोहोचले होते. सध्या मात्र दर कमी झाल्याने बुकिंग करणाऱयांची संख्या वाढली आहे. केवळ बेळगावच नाही तर कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग येथून प्रवासी बेळगावमधून प्रवास करत आहेत.









