सांगली :
तुम्हाला आता पत्र किंवा पार्सल पाठवण्यासाठी पोस्टात जाण्याची गरज नाही. टपाल विभागाने ग्राहकांसाठी अभिनव सुविधा सुरू केली असून घरबसल्या ऑनलाईन नोंदणी करून पत्र किंवा पार्सल थेट पोस्टमनकडे देता येणार आहे. यामुळे ग्राहकांचा वेळ, श्रम आणि पोस्टाच्या रांगेतील त्रास मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
ही नवी सेवा ‘एपीटी २.०’ (अॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी) अंतर्गत ४ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ग्राहकाने पोस्टाच्या अधिकृत पोर्टलवर आपले पार्सल नोंदवायचे, त्याचे शुल्क ऑनलाईन भरायचे आणि नंतर पोस्टमन घरी येऊन पार्सल घेऊन जाईल. इच्छुक ग्राहकांना थेट पोस्टातही जमा करता येते. ५०० रुपयांखालील मूल्याच्या पार्सलसाठी पोस्टमन फक्त ५० रुपये सेवा शुल्क आकारतो, तर ५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मूल्याचे पार्सल पाठवताना कोणतेही शुल्क लागत नाही.
ही सुविधा वैयक्तिक ग्राहकांबरोबरच बँका, पतसंस्था, इ-कॉमर्स कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी अत्यंत सोयीची ठरत आहे. जिल्ह्यात या पोर्टलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ऑगस्ट महिन्यात ७५१ जणांनी नोंदणी केली. तब्बल आजअखेर १३,०५२ लोकांनी या सेवांचा लाभ घेतल्याची माहिती टपाल विभागाने दिली.
- ऑनलाईन पेमेंटची सुविधा :
ग्राहकाने प्राप्तकर्त्याचे नाव, पत्ता, पिनकोड आणि स्वतःची माहिती भरल्यानंतर पार्सलचे वजन व आकार टाकायचा. त्यानंतर त्वरित खर्च दाखवला जातो. त्यासाठी क्यूआरकोड तयार होतो आणि ऑनलाईन पैसे भरता येतात. तसेच सर्व माहितीचा तपशील व बारकोड मिळतो. त्याची प्रिंट काढून पार्सलला जोडल्यावर पोस्टमन घरी येऊन पार्सल घेऊन जातो.
- या योजनेचे फायदे
▶ घरबसल्या पार्सल बुकिंग व पोस्टमनकडून संकलन
▶ ट्रॅक अँड ट्रेसद्वारे पार्सलची लोकेशन पाहण्याची सुविधा
▶ ऑनलाइन खर्च व तात्काळ पेमेंट पर्याय
▶ व्यावसायिकांसाठी वॉलेट पेमेंट व मासिक बिल
▶ ग्राहकांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र नियंत्रण यंत्रणा
- नोंदणी प्रक्रिया
ग्राहकांनी www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर ‘कस्टमर लाईन’ हा पर्याय निवडावा, गेस्ट लॉगिन सामान्य ग्राहकांसाठी, स्पीड पोस्टद्वारे ३५ किलोपर्यंत पार्सल. दर ४१ रुपये पासून. रजिस्टर लॉगिन व्यावसायिकांसाठी, रजिस्टर पार्सल २० किलोपर्यंत. दर ४२ रुपये पासून. बिझनेस ग्राहक लॉगिन स्पीड पोस्ट (३५ किलो) व बिझनेस पार्सल (२ किलो). अनुक्रमे दर ४१ रुपये व ८० रुपये पासून. या पोर्टलवरून एकाचवेळी अनेक पार्सल बुक करण्याचीही सोय आहे.








