विरोधी पक्षांच्या महाआघाडीला मिळणार नवे नाव : शिमल्यातील बैठकीत होणार शिक्कामोर्तब
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विरोधी पक्षांच्या अलिकडेच झालेल्या बैठकीनंतर नव्याने आकारास येणाऱ्या महाआघाडीला नवे दिले जाणार आहे. या आघाडीला पेट्रियोटिक डेमोक्रेटिक अलायन्स (पीडीए) म्हणजेच देशभक्त लोकशाहीवादी आघाडी नाव मिळणार आहे. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी जमलेल्या पक्षांच्या आघाडीचे नवे नाव भाकपचे नेते डी. राजा यांनी जाहीर केले आहे. या नावावर सर्व पक्षांमध्ये सहमती झाल्याचे समजते. शिमला येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या पुढील बैठकीदरम्यान याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ म्हणजेच एनडीए सध्या केंद्रात सत्तेवर आहे. भाजप विरोधी पक्षांनी 23 जून रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे बैठक घेत एकत्र येण्यासंबंधी चर्चा केली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता. या बैठकीत काँग्रेसच्या वतीने संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे पुत्र राहुल गांधी तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सामील झाले होते. बैठकीनंतर आघाडीच्या नावाची घोषणा झालेली नसली तरीही डी. राजा यांनी संबंधित नवे नाव जाहीर केले आहे. बैठकीनंतर 15 पैकी 14 पक्ष पत्रकार परिषदेद्वारे प्रसारमाध्यमांना सामोरे गेले होते. भाजपविरोधी पक्षांच्या पुढील महिन्यात शिमला येथे होणाऱ्या बैठकीत देशभक्त लोकशाहीवादी आघाडी (पीडीए) या नावावर शिक्कामोर्तब होईल. बैठकीत सामील सर्व पक्षांनी भाजपला सत्तेवरून हटविण्याचा निर्धार केला आहे. पुढील वाटचालीची रुपरेषा तयार करण्यासाठी शिमला येथे बैठक होईल आणि आघाडीचे नवे नाव आणि नव्या संयोजकाची घोषणा केली जाणार असल्याचे डी. राजा यांनी बिहारमधील पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर बोलताना सांगितले आहे. नव्या आघाडीचे संयोजक म्हणून नितीश कुमार यांचे नाव जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
सोनिया गांधी संपुआच्या सर्वेसर्वा
जवळपास 18 पक्षांना एकत्र आणून निवडणूक लढविणाऱ्या संयुक्त प्रगतिशील आघाडीसाठी (युपीए) ती विसर्जित करण्याचा निर्णय घेणे सोपे ठरणार नाही. संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी असून नव्या नावाने आघाडी स्थापन झाल्यास त्यांची भूमिका संपुष्टात येणार आहे. तसेच संपुआ असताना राष्ट्रीय पातळीवर एक नवी आघाडी उदयास येणेही अवघड आहे. महाआघाडीत सध्या तरी नितीश कुमार हे प्रमुखाच्या भूमिकेत असून ते नावाबद्दल हट्ट धरणार नाहीत. परंतु तृणमूल काँग्रेस, आप, समाजवादी पक्ष संपुआत सामील होण्याची शक्यता कमीच आहे. या पक्षांना कुठल्याही स्थितीत काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्याची इच्छा नाही.









