केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा : सुरक्षा दलांच्या मोहिमेला मिळतेय यश
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात नक्षलवादाने प्रभावित जिल्ह्यांची संख्या आता केवळ सहाच राहिली असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केली आहे. यापूर्वी नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 12 होती, परंतु मागील काही महिन्यांमध्ये नक्षलवादाच्या विरोधात सरकारने राबविलेल्या मोहिमेमुळे नक्षलवादाची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे.
31 मार्च 2026 पर्यंत देश पूर्णपणे नक्षलमुक्त होणार असल्याच्या संकल्पाचा शहा यांनी मंगळवारी पुनरुच्चार केला आहे. मोदी सरकार सशक्त, सुरक्षित आणि समृद्ध भारत निर्माण करत आहे. आम्ही विकासाच्या मार्गावर वाटचाल करत असून वेगाने देश नक्षलमुक्त होत असल्याचे शहा यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.
31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत प्रतिबद्ध आहे. नक्षलमुक्त भारताच्या निर्मितीच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आज आमच्या देशाने डाव्या उग्रवादाने सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या 12 वरून कमी करत 6 वर आणण्याची मोठी कामगिरी केली असल्याचे शहा यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार नक्षली कारवाया आणि हिंसा अद्याप जारी असलेल्या जिल्ह्यांना डाव्या उग्रवादाने प्रभावित मानले जाते.
10 वर्षांमध्ये 29 जिल्हे नक्षलमुक्त
संबंधित जिल्ह्यांना ‘सर्वाधिक प्रभावित जिल्ह्या’च्या स्वरुपात वर्गीकृत करण्यात आले आहे. 2015 मध्ये हे वर्गीकरण सुरू करण्यात आले होते. याचबरोबर आणखी एक उपवर्ग असून तो ‘चिंताजनक जिल्ह्यांच्या’ श्रेणीचा आहे. ही उपश्रेणी 2021 मध्ये निर्माण करण्यात आली होती. मागील समीक्षेनुसार सर्वाधिक प्रभावित जिल्हे 21 होते. अधिकृत आकडेवारीनुसार 2015 मध्ये असे 35 जिल्हे, 2018 मध्ये 30 जिल्हे आणि 2021 मध्ये 25 जिल्हे होते. आता हा आकडा वेगाने कमी होत आहे. मागील 10 वर्षांमध्ये 29 जिल्ह्यांमधून नक्षलवाद समाप्त झाला असून आता केवळ 6 जिल्ह्यांपुरती ही समस्या मर्यादित राहिली आहे.









