प्रवाशांना गुगल पे, फोन पेद्वारे काढता येणार तिकीट
बेळगाव : सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी परिवहनने कॅशलेस ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. या नव्या युपीआय प्रणालीला मंगळवारी बसस्थानकात चालना देण्यात आली. विभागीय नियंत्रक गणेश राठोड, डीटीओ के. के. लमाणी व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नव्या प्रणालीला प्रारंभ करण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर बेळगाव आगारात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत सर्वच बसेसमध्ये ही नवीन प्रणाली सुरू होणार आहे. या नवीन प्रणालीमुळे प्रवासी क्युआरकोड स्कॅन करून युपीआय पेमेंटद्वारे तिकिटाचे पैसे अदा करू शकतात. त्यामुळे आता खिशात सुटे पैसे आहेत की नाहीत याची चिंता करण्याची गरज नाही. तिकीट रक्कम अदा करण्यासाठी प्रवाशांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पेमेंट अॅपचा वापर करता येणार आहे. त्यानुसार फोन पे, गुगल पे सारख्या सर्व युपीआय पेमेंटसाठी वाहकाकडे (कंडक्टर) अँड्रॉईड तिकीट मशीन दिली जाणार आहे. परिवहनचा प्रवास ऑनलाईन व्हावा यासाठी परिवहनने डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदीचा पर्याय उपलब्ध केला आहे. या नव्या मशीनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशाऐवजी युपीआय, क्युआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करून तिकीट काढता येणार आहे. यापूर्वी हुबळी आगारात प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्याठिकाणी प्रयोग यशस्वी झाल्यानंतर बेळगाव आगारातही नवीन प्रणाली सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना गुगल पे व फोन पेद्वारे तिकीट काढता येणार आहे.
बस कंडक्टरना नवीन अँड्रॉईड मशीन
बेळगाव आगारात नव्या डिजिटल पेमेंट प्रणालीला प्रारंभ करण्यात आला आहे. बसच्या कंडक्टरकडे नवीन अँड्रॉईड मशीन देण्यात आली आहे. या मशीनला स्कॅन करून प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे. गुगल पे, फोन पे आदी डिजिटल पेमेंटचा वापर करता येणार आहे.
– गणेश राठोड (विभागीय नियंत्रक)









