भिंतीवरील राष्ट्रीय पक्षांच्या जाहिराती हटविण्यासाठी कारवाई : ताण वाढल्याने नाराजी
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध जाहिरात फलक हटविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. त्याचप्रमाणे भित्तीपत्रके व ठिकठिकाणी रंगविण्यात आलेल्या राष्ट्रीय पक्षांच्या जाहिराती हटविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे जाहिराती असलेल्या भिंती रंगविण्याची वेळ चक्क महापालिका महसूल निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांवर आली आहे. विधानसभा निवडणुकीकरिता विविध कामांच्या जबाबदाऱ्या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आचारसंहितेअंतर्गत येणाऱ्या नियमावलींची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जाहिरात फलक हटविण्यात येत आहेत. तसेच निवडणुकीकरिता अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे व ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत जनजागृती करणे, असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. जाहिरात फलक आणि भिंतीवर रंगविलेल्या राष्ट्रीय पक्षांच्या जाहिराती हटविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली आहे. त्यामुळे महापालिकेकडून शहर व उपनगरांतील जाहिरात फलक हटविण्यात येत आहेत.
कार्यालयीनसह भिंती रंगविण्याचेही काम
महापालिका महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी देण्यात आल्याने सर्व ठिकाणी असलेले जाहिरात फलक हटविले जात आहेत. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची वाहन तपासणीसाठी चेकपोस्टवर नियुक्ती केली आहे. ही कामे करीत असताना कार्यालयीन काम करण्याची सूचनाही आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे मनपा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. अशातच भिंतीवर रंगविलेली राष्ट्रीय पक्षांची चिन्हे व जाहिराती हटविण्यासाठी भिंती रंगवाव्या लागत आहेत. कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त भिंती रंगविण्याचे काम करावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भिंतीवरील पक्षांची चिन्हे हटविण्यासाठी पांढरा रंग लावण्यात येत आहे.









