शोधमोहिमेत वनखात्याची यंत्रणा कुचकामी
बेळगाव : चौदा ट्रप कॅमेरे, सहा पिंजरे, तीन ड्रोन कॅमेरे आणि 70 कर्मचाऱयांसह शोधमोहीम सुरु ठेवलेल्या वनखात्याला 12 दिवसांनंतरही बिबटय़ाला पकडण्यात अपयश आले आहे. त्यामुळे अखेर बिबटय़ा गेला कुठे? असा प्रश्न साऱयांनाच पडला आहे. शिवाय रेसकोर्स परिसरातून बिबटय़ा निसटला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. मागील 12 दिवसांपासून बिबटय़ाचा शोध न लागल्याने आता बिबटय़ाच्या शोधासाठी मुधोळ जातीच्या श्वानाचा वापर करावा, अशा सूचना पालकमंत्री कारजोळ यांनी केल्या आहेत. त्यामुळे रेसकोर्स परिसरात मुधोळ श्वानाच्या माध्यमातून शोधमोहीम हाती घेतली जाणार आहे.
वनखात्याची यंत्रणा कूचकामी
जाधवनगर परिसरात 5 ऑगस्ट रोजी एका गवंडय़ावर हल्ला करून बिबटय़ाने रेसकोर्स आसरा घेतला आहे. दरम्यान मागील बारा दिवसांपासून वनखात्याची सारी यंत्रणा बिबटय़ाच्या मागावर आहे. मात्र त्याला अपयश आले आहे. टॅप कॅमेरे, पिंजरे, ड्रोन आणि वन खात्याच्या कर्मचाऱयांनी रेसकोर्स परिसरातील 30 एकर क्षेत्र पिंजून काढले आहे. मात्र बिबटय़ाच्या साध्या पाऊलखुणा, वि÷ा किंवा इतर कोणतीही बाब हाती लागली नाही. त्यामुळे बिबटय़ा गेला कुठे? असा प्रश्न देखील वनखात्याला पडला आहे. 12 दिवसानंतरही बिबटय़ाचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे वनखात्याची यंत्रणा कूचकामी ठरत आहे.
मागील आठवडाभरात येडुरवाडी, बेळगाव, मुडलगी या ठिकाणी बिबटय़ा, भुतरामहट्टीत हरीण तर मोदगा येथे तरस आढळून आले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शिवाय मानवी वस्तीत वनप्राण्यांचा वावर आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी वनखाते कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांत बिबटय़ाची धास्ती
वनखात्याने बिबटय़ाच्या शोधासाठी सारी यंत्रणा कामाला जुंपली आहे. मात्र त्याला यश आले नाही. सुरुवातीच्या दोन दिवसांत एका ट्रप कॅमेऱयात बिबटय़ाची छबी कैद झाली होती. त्यामुळे आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र त्यानंतर बिबटय़ाचा थांगपत्ता लागला नाही. शिवाय रविवारी रात्री हनुमाननगर डबल रोड मार्गावरून जाणाऱया एक कुटुंबियाला बिबटय़ा संरक्षण भिंतीवरून उडी मारून जाताना दिसला होता. दरम्यान त्या कुटुंबियांनी ही माहिती वनखात्याला दिली. तरी देखील वनखात्याने अद्याप बिबटय़ा आहे की नाही किंवा दुसरीकडे गेला आहे, याबाबत स्पष्ट केले नाही. त्यामुळे नागरिकांना बिबटय़ाबाबत धास्ती आहे.
बिबटय़ासाठी शोधमोहीम सुरु आहे. मात्र कोणताही पुरावा हाती लागला नाही. बिबटय़ा बाहेर पडल्याचा अंदाज आहे. मात्र बिबटय़ासाठी शोधमोहीम सुरुच राहणार आहे. शिवाय मुधोळ जातीच्या श्वानामार्फत शोध सुरु होणार आहे.
मल्लिनाथ कुसनाळ (एसीएफ वनखाते)









