वर्षभरात 93 चकमकींमध्ये 172 दहशतवाद्यांना कंठस्नान
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये घट झाली असली तरी येथील कुरापतींना पूर्ण लगाम घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कंबर कसली आहे. पाकिस्तान सतत सीमेपलीकडून घुसखोरी करून जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून भारतीय जवान आणि नागरिकांना लक्ष्य करण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी भारतीय सैन्याने आपल्या तत्परतेने पाकिस्तानचे नापाक मनसुबे उधळून लावत अनेक दहशतवाद्यांना यमसदनी पाठविल्याचे डीजीपी दिलबाग सिंग आणि जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंग यांनी जम्मूमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या 4 वर्षांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये घट झालेली आहे. 2022 मध्येही दहशतवाद्यांचे बरेच मनसुबे उधळून लावण्यात आले. सक्रिय दहशतवाद्यांची संख्या यावषी सर्वात कमी आहे. जैश-ए-महंमत, लष्कर-ए-तोयबा, टीआरएफ आदी संघटना खोऱयात घातपात घडवण्याचा प्रयत्न करतात. या कारवायांना पाकिस्तान त्यांना पाठिंबा देत असते, असे दिलबाग सिंग म्हणाले.
सुरक्षा दलांसोबतच आता जम्मू शहरही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. यावषीही अनेक सीआरपीएफ आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दहशतवादी आणि त्यांना साथ देणाऱया सहकाऱयांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे. यादरम्यान दहशतवाद्यांना मदत करणारी आणि त्यांना रसद पुरवणारी 50 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी एकूण 649 ग्राउंड कामगारांवर कारवाई केली आहे. तसेच आता 2023 मध्ये आम्ही ‘मिशन झिरो टेरर’ सुरू करून केंद्रशासित प्रदेशाला दहशतवादापासून पूर्णपणे मुक्त करणार आहोत, असे जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक म्हणाले. 2022 मध्ये खोऱयात 93 चकमकी झाल्या असून 42 विदेशी दहशतवाद्यांसह एकूण 172 दहशतवादी मारले गेल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावषी दहशतवाद्यांच्या नव्या भरतीत 37 टक्के घट झाली आहे. नव्याने भरती झालेले दहशतवादी खोऱयात सक्रिय होण्यापूर्वीच त्यांना निष्प्रभ करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जम्मू-काश्मीरमधील वेगवेगळय़ा चकमकींमध्ये यावषी मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.









