आरपीएफ जवानांची कारवाई : 11 किलो गांजा जप्त
बेळगाव : रेल्वेमधून गांजा, मद्य, तसेच इतर अमलीपदार्थांची वाहतूक वाढली आहे. ही वाहतूक रोखण्यासाठी आता आरपीएफ व रेल्वे पोलिसांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी शालिमार-वास्को एक्स्प्रेसमध्ये तब्बल 11 किलो 500 ग्रॅम गांजा पकडण्यात आला. दोन बॅगमध्ये बेवारस पद्धतीने गांजा ठेवण्यात आला होता. याची चौकशी करून आरपीएफ जवानांनी तो ताब्यात घेतला. काही दिवसांपूर्वीच वास्को व लोंढा रेल्वेस्थानकांवर पोलिसांनी कारवाई करत अवैधरित्या सुरू असलेल्या मद्य वाहतुकीला ब्रेक लावला होता. रस्ते वाहतुकीद्वारे गांजाची वाहतूक करणे अवघड असल्याने आता रेल्वेमधून अमलीपदार्थांची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. कोप्पळ ते गदग या दोन रेल्वेस्थानकांदरम्यान आरपीएफने कारवाई केली. एकूण आठ बंडल्समध्ये गांजा बांधून ठेवण्यात आला होता. गदग रेल्वेस्टेशन येथे अबकारी खात्याच्या उपस्थितीत ही पाकिटे फोडण्यात आली. यामध्ये 11 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. बाजारात त्याची किंमत अंदाजे 11 लाख 50 हजार रुपयांपर्यंत आहे. गदग अबकारी विभागाकडे हा गांजा देण्यात आला. यावेळी हुबळी विभागाचे आरपीएफ पोलीस इन्स्पेक्टर पुट्टस्वामीगौडा, मंजुनाथ सी. के., शरणाप्पा के., हुल्लीकोप्पी यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.









