क्रिकेट हा खेळ भल्या भल्या ज्योतिषांना, किंवा माझ्यासारख्या क्रिकेट विश्लेषकांना कधी तोंडावर पाडेल हे सांगता येत नाही. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याअगोदर सर्वसाधारण एक अंदाज होता की भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आणि इंग्लंड किंवा फार फार तर या चार पैकी एक फ्लॉप झाला तर पाकिस्तान हे संघ आरामात सुपरफोर मध्ये प्रवेश करतील असंच सर्वसाधारण भविष्य वर्तवलं होतं. स्पर्धा सुरू होण्याअगोदर भारत ओळीने सात सामने जिंकतील अशी जर कोणी भविष्यवाणी केली असती तर त्याला मूर्खात काढले गेले असते. सुरुवातीला इस्टमन कलर वाटणारा चित्रपट बघता बघता रंगीत होऊन गेलाय. दक्षिण आफ्रिके बद्दल कोण खात्रीने म्हणत नव्हतं की हा संघ उपांत्य फेरीत धडक मारेल. परंतु बघता बघता आफ्रिकेचा संघ कधी उपांत्य फेरीत पोहोचला हे समजलं नाही.
दक्षिण आफ्रिका संघाचा विचार केला तर 1970 पासून दक्षिण आफ्रिकेतील सरकारने वर्णभेदाचे धोरण अवलंबले होते. त्यांचा पूर्ण देश काळ्या आणि गोऱ्या रंगांमध्ये अडकला होता. त्यामुळेच की काय 1970 ते 1991 हा काळ दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेटसाठी खराब काळ होता. वर्णद्वेष्याचा कारणास्तव वीस वर्ष त्यांच्यावर बंदी होती. परंतु हे ग्रहण 1991 मध्ये सुटले आणि प्रथमच त्यांनी भारताचा दौरा केला होता. 1970 पूर्वीचा आफ्रिकेचा संघ हा ऑस्ट्रेलियापेक्षाही भारी होता. 1991 नंतर या संघाने बऱ्यापैकी कात टाकली. क्रिकेटमध्ये सर्वात जास्त अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ तो म्हणजे दक्षिण आफ्रिका. शॉन पोलॉक, जॅक कॅलीस, हँसी क्रोनिए अशा दिग्गज मंडळी मंडळीने आफ्रिकेतील क्रिकेटचा स्तर उंचावला. आयसीसी आयोजित 1998 ची चॅम्पियन्स ट्रॉफी हे फक्त त्यांच एकमेव यश. परंतु त्यांना मोठ्या स्पर्धेत नशिबाची साथ मिळत नव्हती. 1992 मध्ये उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पावसामुळे समीकरण बदल्यामुळे एक चेंडू 12 धावा असं विचित्र समीकरण धावफलकावर बघायला मिळालं होतं. दुसरीकडे 1999 च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला तो टाय सामना, लॉन्स क्रुझरनरच्या हाता तोंडाशी आणलेला घास अॅलन डोनाल्डने मातीमोल केला. आणि नेट सरासरीवर ऑस्ट्रेलिया संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. अशा या विविध कारणास्तव दक्षिण आफ्रिकेला पुढे चोकर्स म्हणून संबोधले जाऊ लागले.
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघाने आपली सर्वोत्तम कामगिरी पेश केली आहे. या स्पर्धेत दोन वेळा 400 चा टप्पा गाठणारा तो एकमेव संघ. स्पर्धेतील काही दिग्गज संघाने दक्षिण आफ्रिकेला हलक्यात घेण्याची चूक केली, अर्थात त्या चुकीचे प्रायश्चित्त त्या संघाला करावाच लागलं. टेंबा बवुमा हा संघाचा कर्णधार आणि त्याची बॅट कधी तळपेल हे सांगता येत नाही. त्याच्या जोडीला डीकॉक, अष्टपैलू खेळाडू मार्करम, मार्को यासीन असे एकापेक्षा एक विस्फोटक खेळी करणारे फलंदाज आहेत. आजच्या सामन्यात त्यांचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना कितपत डॉमिनेट करतात हे बघणं औसुक्याचे ठरणार आहे. भारतीय संघाची गाडी सध्या तरी सुसाट आहे. आणि जर तुम्ही मला जर विचारलं तर ख्रया अर्थाने दोन हात करू शकेल असा संघ कुठला असेल तर तो लढवय्या दक्षिण आफ्रिका.
दुसऱ्या बाजूने हा लेख लिहित असताना हार्दिक पंड्या विश्वचषकाच्या बाहेर गेला ही बातमी कानावर आली. पंड्याशिवाय भारतीय संघ उपांत्य फेरी खेळणार हा एक भारताला जबरदस्त धक्का आहे. परंतु पंड्याशिवाय ही भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे हे विसरून चालता येणार नाही. मी कालच्या लेखात म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा भारतीय संघातील खेळाडूंनी दुखापती पासून सावध राहायला पाहिजे. येणाऱ्या सामन्यात आपल्याला दुखापत ही निश्चितच परवडण्यासारखी नाही आहे. कारण उर्वरित दोन सामन्यानंतर तिसरा सामना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता त्याच अनुषंगाने टीम मॅनेजमेंट आता कुठल्या खेळाडूला विश्रांती देणार किंबहुना आहे तोच संघ फॉलो करणार हे बघणं औसुक्याचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी मायकल वॉन म्हणाला होता की, जो भारतीय संघाला कडवी लढत देईल तोच संघ अंतिम फेरीत आगेकूच करू शकेल. अर्थात तोच संघ आफ्रिका आहे की नाही हे येणारा काळच ठरवेल. थोडक्यात मी एवढेच म्हणेन की लीगमधील हा सामना दोन वाघांमध्ये आहे. अर्थात या लढतीतून फार मोठा फरक पडणार नाही हे हि तेवढेच खरं. अर्थात या लढतीकडे क्रिकेट शौकीन अंतिम फेरीपूर्वीची रंगीत तालीम या दृष्टिकोनातून बघितलं तर त्यात नवल वाटू नये. अर्थात ही लढत दोन वाघांमध्ये आहे एवढं मात्र खरं!









